माझा वाढदिवस साजरा करू नका – मुख्यमंत्री

माझा वाढदिवस साजरा करू नका – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत बजावले आहे. शिवाय ज्याला कुणाला वाढदिवसासाठी खर्च करायची इच्छा असेल, त्यांनी तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावा, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नुकतीच रावसाहेब दानवे यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच, आशिष शेलार यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्यावर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. त्यापूर्वी त्यांनी जाहीर पत्रक काढून हे आवाहन केलं.


हेही वाचा – दानवेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील नवे प्रदेशाध्यक्ष, लोढांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी!

‘बॅनर्स लावले, तर कारवाई करू’

गेल्या महिन्याभरात तिवरे धरण दुर्घटना, मालाड भिंत दुर्घटना, गोरेगाव-वरळीत झालेले मुलांचे मृत्यू आणि आता डोंगरीत कोसळलेली भिंत या दुर्घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यंमत्र्यांनी या कार्यक्रमात येत्या २२ जुलैला असलेल्या आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम करू नये, असं आवाहन केलं आहे. ‘आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग्ज, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, हे प्रत्येक आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनिश्चित करावे. जल्लोषाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत. जे कुणी असे करताना आढळतील, त्यांच्यावर रीतसर पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल. वाढदिवसानिमित्त ज्या कुणाला खर्च करण्याची इच्छा असेल त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान म्हणून द्यावा’, असेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनामुळे भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांचं पंचाईत झाली आहे. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिकिटासाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांची मुख्यमंत्र्यांना खूश करण्याची संधी देखील हुकल्याचं बोललं जात आहे!

First Published on: July 17, 2019 5:53 PM
Exit mobile version