‘चेस द व्हायरस’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘चेस द व्हायरस’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत राबवलेली ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असल्याचं जाहीर केलं. प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली. मात्र, १२ कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही कठीण गोष्ट असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन करत प्रत्येकाने आपल्या प्रभागाची काळजी घेतली तर हे शक्य असल्याचं म्हटलं.

महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे, या बारा कोटी जनतेची आरोग्य तपासणी ही अशक्यप्राय आणि अवघड गोष्ट आहे. या मोहीमेत प्रत्येकाचं घर शोधणं ही कठीण बाब असली तरी शक्य आहे. सरपंचापासून खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागाची जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र आपण व्यापू शकतो. याद्वारे प्रत्येक घराची आणि त्यातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी आपण करु शकतो. पुढील महिन्याभरात या लोकप्रतिनिधींनी किमान दोन वेळा लोकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आपली टीम पाठवावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या योजनेसाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे कर्मचारी तसंच इतर आरोग्य कर्मचारी काम करतील. त्याचबरोबर त्यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी होऊ शकतात. हे लोक प्रत्येक घरातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी करतील. या चौकशीमध्ये घरोघरी जाऊन त्यांच्या घरातील सदस्यांच्या आरोग्याबाबत साधारणतः विचारपूस करतील. यामध्ये घरात पन्नाशीच्या पुढील किती सदस्य आहेत? त्यांची ऑक्सिजन लेवल काय आहे? त्यांच्यासह इतर व्यक्तींना व्याधी किंवा आजाराची कोणती लक्षणं आहेत का? जर काही लक्षणं असतील तर ती शासनाच्या यंत्रणेच्या लक्षात आणून द्यायची, त्यानंतर यावर पुढील उपचार काय करायचे? कुठे करायचे? याचं मार्गदर्शन शासकीय टीम त्यांना करेल. मुंबईत ज्या प्रकारे ‘चेस द व्हायरस’ ही योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

कोरोनाचे संकट गेलं नाही, संकट वाढत चाललं आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असं आवाहन केलं. राज्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती दिली. मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे. गर्दीच्या ठिकाणी सदा सर्वदा मास्क लावा, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती अनपेक्षित

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती अनपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
न्यायालयीन लढाईसाठी आम्ही सर्वोत्तम वकील दिले. मराठा आरक्षणाबद्दल कोर्टात बाजू मांडण्यास कमी पडलो नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षण प्रकरणासंबंधीत अनेक संस्था ज्या यामध्ये पोटतिडकीने काम करत आहे, तसंच अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अजित पवार, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, जंयत पाटील, दिलीपराव वळसे पाटील सह अनेक नेत्यांशी संवाद साधला. याशिवाय जेष्ठ विधी तज्ज्ञांशी चर्चा करत न्यायालयासमोर बाजू मांडली, तरी देखील असा निकाल आला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. त्यांनी या प्रकरणात कोणतंही राजकारण न करता सरकार सोबत आहोत, असं आश्वासन दिलं आहे. आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांशी चर्चा करत आहोत आणि पुढील आखणी करत आहोत. आरक्षणप्रश्नी पुढची लढाई कशी लढायची याची आखणी सुरु आहे. यावेळी मराठा समाजासोबत सरकार कायम आहे, मराठा समाजाने रस्त्यावर कृपया आंदोलन करु नये, कोरोनाच्या संकटात आंदोलन आणि मोर्चे काढू नका, असं आवाहन केलं. सरकार तुमच्या मागण्यांशी कटिबद्ध असून मराठा समाजाला न्याय मिळवून देणारच, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

ग्रामीण भागातील जनतेशी मी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधतोय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून असतात, ते घराबाहेर पडत नाहीत अशी टीका माझ्यावर विरोधक करत आहेत. मात्र त्यांना हे कळत नाही की तुम्ही जिथे जाऊ शकलेला नाहीत तिथे मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाऊन आलो आहे. तिथल्या लोकांशी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. तुम्ही ज्या दुर्गम भागांमध्ये जाऊ शकलेला नाहीत त्या ठिकाणी मी जाऊन आलोय. तिथल्या लोकांशी संवाद साधला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी तिथे जाऊन आलो आहे. असं म्हणत विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published on: September 13, 2020 1:37 PM
Exit mobile version