मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या!

महाराष्ट्र राज्य मंत्रालय

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून किमान १०० अधिकाऱ्यांच्या तरी बदल्या झाल्या आहेत. त्यात आता अजून ५ अधिकाऱ्यांची भर पडली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या पदांवरच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुरुवारी काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बदल्यांचे आदेश दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या रणनीतीचाच हा एक भाग असावा, अशी चर्चा आता राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कुणाच्या झाल्या बदल्या?

१) महसूल, रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी, तसेच वनविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी असणारे १९८६च्या बॅचचे आयएएस अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे आता वनविभाग आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार असेल.

२) नगर विकास मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची महसूल, रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

३) जलसंवर्धन विभागाचे मुख्य सचिव आय. एस. चहल यांची नगरविकास विभागाचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

४) महसूल आणि वनविभागाचे मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांची उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

५) १९९६ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय खंदारे यांची अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

First Published on: February 20, 2020 10:19 PM
Exit mobile version