केंद्र सरकार हे परदेशातलं सरकार नव्हे; राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी – मुख्यमंत्री

केंद्र सरकार हे परदेशातलं सरकार नव्हे; राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागू, या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला. आर्थिक मदतीच्या मुदतीवरून राजकारण करु नये, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

अतिवृष्टीचं संकट टळलं नसून नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सध्या आम्ही माहिती घेण्याचं काम करत आहोत. विविध भागांमध्ये नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागू, या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला. केंद्र सरकार हे आपल्याच देशातील सरकार आहे, परदेशातील नव्हे. राज्यांना मदत करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राज्यातील विरोधक केवळ पक्षीय राजकारणाचा विचार करत असतील. परंतु, देशाच्या सरकारला मदत करताना पक्षपात करून चालत नाही. अतिवृष्टीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला होता. त्यामुळे त्यांना या सगळ्याची जाणीव असेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत

अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी चार लाख रुपयांच्या धनादेशाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक जीवितहानी सोलापूर जिल्ह्यात झाली. सोलापुरातील दहा मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत करण्यात आली.

घाबरु नका, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही

नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी राज्यातील अतिवृष्टीचा धोका अजून सरलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची इशारा वेधशाळेने दिला आहे. त्यामुळे गाफील राहू नका, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

First Published on: October 19, 2020 3:44 PM
Exit mobile version