महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजपला घेरलं

महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजपला घेरलं

साखरेचा गोडवा राजकारणात आणला

गेल्यावेळीच आपण शिवसंपर्क अभियान राबवणार होतो. परंतु कोरोनाटी लाट आली. त्यानंतर नेमकं माझं माणेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. येत्या काही दिवसांमध्ये मी सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच दोन वर्षांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच महाराष्ट्र पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेचे विचार गावा गावात पोहोचवणे गरजेचे

राज्यात एकामागोमाग एक घटना घडत असून या सर्वांना आपण तोंड देत आहोत. मला एका जागी बसावं लागत आहे. परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल. तुमची साथ आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून राज्याचे काम पुढे नेत आहे. शिवसेनेचे विचार गावा गावात पोहोचवणे गरजेचे आहे. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन ठाकरेंनी केलंय.

एमआयएम ही भाजपची बी टीम

मुख्यमंत्र्यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजपला घेरलं आहे. एमआयएमसोबत कोणतीही युती होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

मग तुम्हाला हिजबुल सेना म्हणायचं का ?

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. उद्या भाजपचे नेते हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला, असे म्हणायलाही कमी करणार नाहीत. काश्मीरमध्ये भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत युती केली होती, याचा त्यांना विसर पडलाय का?, आम्ही जनाब सेना मग तुम्हाला हिजबुल सेना म्हणायचं का, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपचं हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपलं हिंदुत्व हे देशाच्या हिताचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे याकडे दुर्लक्ष करू. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका आणि त्यांचा डाव हाणून पाडा, असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


हेही वाचा : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियाकडून हायपरसॉनिक हल्ला, हे क्षेपणास्त्र किती धोकादायक ?, भारताकडे आहे का क्षमता?


 

First Published on: March 20, 2022 2:13 PM
Exit mobile version