भुजबळ साहेब, काळजी करू नका, नीट व्यवस्था लावून ठेवलीय

भुजबळ साहेब, काळजी करू नका, नीट व्यवस्था लावून ठेवलीय

नाशिकमधील सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

भुजबळसाहेब, तुम्ही स्वातंत्र्य सैनिक किंवा आंदोलक म्हणून नव्हे तर, भ्रष्टाचार म्हणून जेलवारी केली. न्यायव्यवस्था सक्षम आहे. काळजी करू नका. तुमची नीट व्यवस्था लावून ठेवलीय, अशा शब्दांत मुत्र्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना लक्ष्य केले. तसेच, ‘दाखव रे तो व्हिडिओ’वरुन पक्षाची बाजू मांडत राज यांचा समाचार घेतला.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील सभेचा शनिवारी, २७ एप्रिलला प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने, नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भुजबळांसह राज ठाकरे यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, भुजबळांचा अविर्भाव पाहता, असा नटसम्राट उभ्या महाराष्ट्राने पाहिला नाही. तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगात गेलात. जनतेच्या तिजोऱ्या तुम्ही लुटल्या. आता आगे आगे देखो होता है क्या. तुम्ही आता तर जामीनावर आहात. खटला चालेल. आमची न्यायदेवता सक्षम आहे. आम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. भुजबळांचे कर्मच त्यांना घेऊन जाईल.

अन्यथा निवेदनं देण्यासाठी जेलमध्ये जावं लागलं असतं

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी नाशिककरांनी हुशारी दाखवली आणि युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना निवडून दिले. ते बरं केलं, नाहीतर भुजबळांना संधी दिली असती तर नाशिककरांना मागण्यांची निवेदनं देण्यासाठी जेलमध्येच जावं लागलं असतं, असे सांगत मुत्र्यमंत्र्यांनी भुजबळांच्या जेलवारीचा चांगलाच समाचार घेतला.

राज यांच्यावरही आसूड; म्हणाले, जे फोटो तुम्ही दाखवता त्यासाठीचा निधी आम्ही दिला

तुम्ही नाशिकमध्ये एवढी विकासकामं केली, तर तुम्हाला नाशिककरांनी घरी का पाठवलं, असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंवरही आसूड ओढले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दोन हजार कोटींच्या विकासकामांचे जे फोटो तुम्ही दाखवता त्याला पैसा जनतेने हाती दिलेल्या तिजोरीतून दिला. तुमचं कर्तृत्व नेमकं काय होतं?

 

First Published on: April 27, 2019 12:52 PM
Exit mobile version