व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला

व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला

दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरात 4 रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातदेखील वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी)नुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात प्रतिसिलिंडर 104 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुदैवाने घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून ते स्थिर आहेत.

नव्या दरानुसार आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर प्रतिसिलिंडर 2,307 रुपयांवर पोहोचले आहेत. हॉटेल-रेस्टॉरंट, स्टॉल्स, अन्नपदार्थांची विक्री करणारे प्रामुख्याने व्यावसायिक दराने एलपीजी सिलिंडर विकत घेतात. त्यामुळे या महागाईच्या झळा हॉटेल, रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांची चव चाखणार्‍यांना बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने आधीच वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यातच सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने महागाईचा भडका उडणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरात शेवटची दरवाढ 1 एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्यात 1954 .5 रुपयांवर असलेले सिलिंडर एप्रिलमध्ये 2205 रुपयांवर जाऊन पोहोचले होते. मागील 8 महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 618.5 रुपयांनी महागल्या आहेत.

मागील 8 महिन्यांतील वाढ (रुपयांमध्ये)

First Published on: May 2, 2022 4:45 AM
Exit mobile version