ठाणे महापालिकेकडून पैशांचा अपव्यय, काँग्रेसचा आरोप

ठाणे महापालिकेकडून पैशांचा अपव्यय, काँग्रेसचा आरोप

ठाणे । संपूर्ण ठाणे शहरात भिंती रंगविणे, रंगचित्रे काढणे, आणि सुशोभीकरणाची कोट्यावधी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत, परंतु हे रंगकाम करताना काही ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत अवघ्या आठ महिन्यापूर्वी काढलेल्या व सुस्थितीत असलेल्या रंगचित्रांवर प्रेशर गनने पाण्याचा मारा करून त्यांचा रंग उडवून पुन्हा त्या ठिकाणी नव्याने रंगचित्रे साकारली जात आहेत. असा आरोप ठाणे शहर काँग्रेसने केला. तसेच याबाबत ठामपाचे संबंधित अधिकारी ढोले व मोरे यांना फोन द्वारे संपर्क साधून व्हाट्सअपद्वारे सर्व प्रत्यक्षदर्शी पुरावे पाठवून निदर्शनास आणून देऊनही अधिकार्‍यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने चांगल्या रंगचीत्रांवर पुन्हा नव्याने रंगकाम करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी वारंवार होत आहेत.असे ही म्हटले आहे.

वास्तविक पाहता स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत काढण्यात आलेल्या व सुस्थितीत असलेल्या चित्रांवर पुन्हा रंगचित्रे काढण्यात येऊ नये, रंगचित्रे रेखाटताना त्या ठिकाणी रंग चित्रांची साईज कंपनीचे नाव व रंगचित्र काढल्याची तारीख नमूद करण्यात यावी, रंगकाम करण्यापूर्वी भिंतीलागत असलेले अडथळे माती डेब्रिज हटवून मगच रंगकाम करण्यात यावे,रंगचीत्राच्या भिंती लगत पदपथाचे काम करताना सिमेंट अथवा इतर रंग उडवून रंगचित्र खराब केले असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करून खर्च वसूल केला पाहिजे, जबाबदार अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली संकल्पनापूर्ण व दर्जेदार पद्धतीने रंगचित्रे काढण्यात यावीत, परंतु असे होताना दिसत नाही.

तरी या रंगचित्रे काढण्याच्या कामात नागरिकांच्या कररूपी पैशांच्या होणार्‍या नासाडीबाबत संगनमताने जी अनियमितता घडून येत आहे त्या अनियमिततेबाबत कायदेशीर प्रक्रियेमध्ये चौकशी करून चांगल्या असलेल्या रंगचित्रावर पुन्हा नव्याने केलेल्या रंगकामाचे देयक अदा करण्यात येऊ नये. तसेच दिलेल्या प्रत्यशदर्शी छायाचित्रानुसार ठेकेदाराचे हित जपणारे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी तथा समाजसेवक राहुल पिंगळे यांनी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

First Published on: November 22, 2022 10:11 PM
Exit mobile version