महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लसी द्यायला सांगा; सचिन सावंत यांची जावडेकरांवर टीका

महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लसी द्यायला सांगा; सचिन सावंत यांची जावडेकरांवर टीका

महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लसी द्यायला सांगा,सचिन सावंत यांची जावडेकरांवर टीका

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सर्वाधिक लसींचा अपव्यय करत असल्याची टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रकाश जावडेकरांवर पलटवार केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रात लसींचा अपव्यय हा ६ टक्के असल्याचा आरोप केला होता. मात्र, केंद्राने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील लसींचा अपव्यय हा ०.२२ टक्के आहे. त्यामुळे मोदी सरकारच्याच माहितीने तुमचा खोटारडेपणा उघड झाला, असं सणसणीत उत्तर सचिन सावंत यांनी दिलं आहे. महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लसी द्यायला सांगा, अशी टीका देखील सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यानी केंद्रातील मोदी सरकारने दिलेल्या माहितीचा तक्ता दिला आहे. यामध्ये कोणत्या राज्यात किती टक्के लसींचा अपव्यव होत आहे याची माहिती दिली आहे. “प्रकाश जावडेकर महाराष्ट्रातील लसींचा अपव्यय ०.२२ टक्के आहे, तुमच्या खोटेपणानुसार ६ टक्के नाही. मोदी सरकारच्याच माहितीने तुमचा खोटारडेपणा उघड झाला. आम्हाला आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवलं व लसींचा कमीतकमी अपव्यय ठेवला.दु:ख याचे वाटतं की महाराष्ट्र भाजपचे तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहात. गंभीर बाब – महाराष्ट्रात फक्त २३५४७ लसी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लसी देत नसतील तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी? महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लसी देण्यास सांगा,” असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

लोक कोरोनापेक्षा मोदी कृपेने आलेल्या तुटवड्यामुळे मरत आहेत

जनतेला मदत जाहीर करावी लागेल म्हणून मोदी जींनी आतापर्यंत प्रतिदिनी ४ लाखांवर रुग्णसंख्या जाऊनही लॉकडाऊन जाहीर केला नाही गतवर्षी ५०००० रुग्णसंख्या असताना मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला होता. देशात मोदी कृपेने ऑक्सिजन, रेमडेसीवीर, बेड, आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. लसीकरणाच्या पुरवठ्याची पूर्ण वाताहत झाली आहे. लोक कोरोनापेक्षा मोदी कृपेने आलेल्या या तुटवड्यामुळे मरत आहेत, अशी टिका सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

 

First Published on: May 4, 2021 10:06 AM
Exit mobile version