२६ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची कुणाला उमेदवारी? यादी तयार!

२६ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची कुणाला उमेदवारी? यादी तयार!

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीवर मोठी चर्चा झाल्यानंतर आता काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीवर देखील चर्चा झडू लागल्या आहेत. कारण या बैठकीमध्ये राज्यातल्या तब्बल २६ लोकसभा मतदार संघांमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची? याविषयी खलबत झालं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा झाली असून कुणाला उमेदवारी दिली जाऊ शकते? यावर चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दिल्लीत होणार अंतिम निर्णय

दरम्यान, उमेदवारांची नावं जिंकून येण्याच्या निकषावर ठरवण्याचा प्रयत्न केल्याचं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. ‘आजच्या बैठकीत तयार झालेली यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे. तिथे या नावांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जिथे नाव बदलण्याची गरज असेल, तिथे ते बदललं जाईल. पण मुंबईतल्या काही जागांवर अद्याप चर्चा व्हायची आहे. नगरमध्ये तर आमच्याकडे जिंकून येणाराच उमेदवार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने गी जागा आम्हाला द्यावी’, असं देखील अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.


हेही वाचा – देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय

प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मकता दाखवावी

दरम्यान, यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या बैठकीविषयी देखील चव्हाणांनी माध्यमांना माहिती दिली. ‘प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावं, अशी आमची मानसिकता आहे. मतांची विभागणी होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आज त्यांच्या घरी चर्चेला गेलो होतो. आतापर्यंत ६ बैठका झाल्या आहेत. आता त्यांनी सकारात्मकता दाखवावी’, असं ते म्हणाले.

First Published on: January 29, 2019 7:58 PM
Exit mobile version