काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सध्या भाजपामध्ये इनकमिंग जोरात सुरू असून, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. दरम्यान सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता सत्तार भाजपामध्ये जातात का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या तिकीट वाटपावरुन काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले आहे.

औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसने विधानपरिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. दरम्यान सत्तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. याबाबत सत्तार म्हणाले की, यापूर्वीच मी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे. तीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर पक्ष लोकसभेचे तिकीट देईल, असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली, यात औरंगाबादसाठी आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावर सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. “मी अनेक महिन्यांपासून लोकसभेची तयारी करत होतो. एल्गार यात्रा आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पक्षवाढीसाठी मी वणवण फिरलो. तरिही पक्षाने मला तिकीट दिले नाही.”, अशी खंत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

First Published on: March 24, 2019 11:08 AM
Exit mobile version