राज्यातून यंदा चार महिला राज्यसभेत जाणार?

राज्यातून यंदा चार महिला राज्यसभेत जाणार?

Rajya Sabha Election : लोकसभेसारखे राज्यसभेमध्येही भाजपकडून मुस्लिम चेहरा नसणार, जाणून घ्या कारण

महाराष्ट्रातून यंदा राज्यसभेवर तीन ते चार महिला सभागृहात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी मंत्री फौजिया खान, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, तर काँग्रेसकडून माजी खासदार रजनी पाटील यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या जागेसाठी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांचे नाव घेतले जात आहे. तसेच भाजपचे रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले ही दोन नावे निश्चित केल्याचे मानले जाते. येत्या २६ मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसह १७ राज्यांतील ५५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी भाजपला तीन जागांवर विजयाची संधी असून चार जागा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत. राज्यसभेतील मावळत्या सदस्यांच्या संख्येनुसार, राष्ट्रवादी दोन, तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवणार असल्याचे समजते.

राष्ट्रवादीचे माजीद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, भाजपचे संजय काकडे आणि अमर साबळे आणि शिवसेनेचे राजकुमार धूत यांच्या फेरनिवडीची शक्यता अंधुक आहे. मावळत्या सात खासदारांपैकी केवळ शरद पवार आणि रामदास आठवले यांचीच फेरनिवड निश्चित मानली जाते. मेमन यांच्या जागी परभणीच्या फौजिया खान यांची निवड झाली असून दलवाई यांच्याजागी रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे आणि राजीव सातव यापैकी एकाची निवड होण्याची चर्चा सुरू आहे. काकडे यांच्या जागी उदयनराजे भोसले यांचे नाव भाजपने निश्चित केल्याचे समजते. अमर साबळे यांच्याजागी विजया रहाटकर किंवा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्यात चुरस आहे. धूत यांच्या जागी शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांना संधी मिळू शकते.


हेही वाचामी फडणवीस यांचा मोहरा मलाच राज्यसभा सदस्यत्व देणार

मराठवाड्यातून तीन महिलांची नावे

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान यांचे नाव निश्चित केल्याचे कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांचेही नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी रजनी पाटील यांना शब्द दिल्यामुळे त्यांनाही पुन्हा राज्यसभेवर आणले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. विजया रहाटकर यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यातून चार पक्षांकडून चार जागांवर महिलांची वर्णी लागण्याची शक्यता असून, तसे घडल्यास फौजिया खान, विजया रहाटकर आणि रजनी पाटील यांच्या रूपाने मराठवाड्याला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळेल.

First Published on: March 3, 2020 1:25 PM
Exit mobile version