“तानाशाही नही चलेगी” म्हणत राहुल गांधींच्या समर्थनार्थ कॉंग्रेस रस्त्यावर

“तानाशाही नही चलेगी” म्हणत राहुल गांधींच्या समर्थनार्थ कॉंग्रेस रस्त्यावर

नाशिक : देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी’ अशी जोरदार घोषणाबाजी करत नाशिकमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेसकडून तीव्र निदर्शने करण्यात आली.

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर राज्यभर काँग्रेस आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. नाशिकच्या शालीमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येऊन मोदी आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपकडून दडपशाही आणि सुडाचे राजकारण करण्यात येत असून राहुल गांधींची खासदारकी परत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून विधान केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्याने देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकूणच राजकीय वातावरण तापले असून कालपासून देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी राहुल गांधींचे ज्या पद्धतीने लोकसभा सदस्य पद रद्द करण्यात आले. हे लोकशाहीला काळिमा फासणारे असून हे सूडबुद्धीच राजकारण आहे. राहुल गांधी हे देशाचा, जनतेचा आवाज आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिक जोडले गेले, अनेक घोटाळे बाहेर आले, तरीही भाजप सरकार हे घोटाळे करणार्‍या नेत्यांना संरक्षण देत आरोप काँग्रेस आंदोलकाकडून करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी नगरसेवक शाहू खैरे, आशा तडवी, वत्सला खैरे, महाराष्ट्र प्रदेश व्हीजेएनटी विभागाचे संतोष नाथ, नाशिक जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, सेवा दल अध्यक्ष वसंत ठाकूर, उल्हास सातभाई, गुलाम शेख, सुभाष देवरे, नंदकुमार कर्डक, रमेश खांडोळी, भारत टाकेकर, ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, बबलू खैरे, उध्दव पवार, कैलास कडलग आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on: March 25, 2023 5:12 PM
Exit mobile version