सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा, नाना पटोलेंवर नाराजी

सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा, नाना पटोलेंवर नाराजी

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमध्ये झालेल्या घडामोडींनुसार सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. कॉंग्रेसमधील नाराजी नाट्य या वृत्तामुळे समोर आले आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस अंतर्गत झालेल्या नियुक्त्यांमुळेच सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे कळते. नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यानेच सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याचे कळते. महत्वाचे म्हणजे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटरच्या बायोमधूनही हे पद काढून टाकल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी आता अतुल लोंढे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळेच सचिन सावंत नाराज असल्याचे बोलले जात आहे. सचिन सावंत यांच्याकडे मिडिया कम्युनिकेशनची जबाबदारी नव्या कार्यकारणीत देण्यात आली होती. त्यांच्यासोबतच जाकीर अहमद यांचीही नियुक्ती करण्यात आली. पण या नियुक्त्यांवर नाराज असलेल्या सचिन सावंत यांनी मात्र आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसमधील अंतर्गत बंड पुन्हा एकदा समोर आले आहे.

सचिन सावंत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये कॉंग्रेसची बाजू सातत्याने मांडली होती. कॉंग्रेसमधून प्रवक्ते पदाचा चांगला अनुभव आणि विषयांची मांडणी करण्यात सचिन सावंत यांचा हातकंडा होता. पण या नियुक्त्यांमध्ये डावलले गेल्याची भावना निर्माण झाल्यानेच सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे कळते. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून नवी यादी जाहीर होताच सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

First Published on: October 19, 2021 7:40 PM
Exit mobile version