मुख्यमंत्र्यांची राज्यातील जनतेला धमकी – सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांची राज्यातील जनतेला धमकी – सचिन सावंत

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’, असे म्हणून राज्यातील जनतेला धमकी दिलेली असून जनतेच्या मनात या विचारानेच धडकी भरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा ऱ्हास झाला असून महाराष्ट्राची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे. हे वास्तव गेल्या दोन दिवसात अधिकच अधोरेखित झाले आहे. या सरकारच्या विरोधात आक्रोश करणारी जनताच चमत्कार घडवेल आणि शिवरायांविरोधातील नवपेशवाईचा अंत करेल असा दृढ विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केला.

विरोधकांचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना सचिन सावंत म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये विरोधकांचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गेल्या दोन दिवसांत अधिकच प्रखर झाल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने कोणत्याही व्यक्तींच्या समस्यांचा पाठपुरावा इतर कोणत्याही व्यक्ती संस्था व संघटनेने करण्यावर घातलेली बंदी ही महाराष्ट्राची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे याचे निदर्शक आहे. आचारसंहिता लागू असताना अशा तऱ्हेचा निर्णय घेताना निवडणूक आयोगाची भीती देखील या सरकारला राहिलेली नाही. या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करून मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही मानसिकता सातत्याने दिसून येत असल्याने ‘मी पुन्हा येईन’ असे मुख्यमंत्र्यांनी म्हणणे हे जनतेत दहशत निर्माण करणारे आहे, असे सावंत म्हणाले.

प्रचारासाठी मोदींच्या चेहऱ्याचा वापर

मुख्यमंत्र्यांना कधीही आपल्या कामावर आपण निवडणूक जिंकू शकतो, याचा विश्वास नव्हता. तसा विश्वास असता तर महाजनादेश यात्रेपासून निवडणूक प्रचारापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांना मोदींचा चेहरा वापरण्याची गरज भासली नसती. मुख्यमंत्र्यांच्या सर्व भाषणांमध्ये कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये फडणविसांसोबत मोदींचा फोटो येईल, याची व्यवस्थित काळजी घेतली गेली आहे.

या निवडणुकीत भाजपाचा अंत करावा

शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या या सरकारनं शिवाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचारासाठी पुतळ्याची उंची कमी केली, कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केलीय महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले विकायला काढले, चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार केला. शिवरायांविरोधातील नवपेशवाईचा जनतेने या निवडणुकीत अंत करावा, असे आवाहन सावंत यांनी केले

‘पाडा रे’ हे रॅप साँग लाँच करण्यात आले

दलबदलू आणि विश्वासघातकी नेत्यांना या निवडणूकीत जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन करत सोशल मीडिया विभागाने तयार केलेल्या ‘पाडा रे’ हे रॅप साँग या पत्रकारपरिषदेत सचिन सावंत व अभिजीत सपकाळ यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. सदर पत्रकारपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळही उपस्थित होते. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

First Published on: October 19, 2019 9:04 PM
Exit mobile version