धार्मिक उन्माद वाढवून ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न

धार्मिक उन्माद वाढवून ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न

देशात सध्या बेरोजगारी, महागाईसारखे ज्वलंत प्रश्न असताना ज्ञानव्यापी मशीद, हलाला, झटका, हिजाब असे मुद्दे समोर केले जात आहेत. देशात धार्मिक उन्माद वाढवून ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केला.

केंद्र सरकारने हे प्रश्न सोडून जनतेला भेडसावत असलेल्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देऊन त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करावा. याकामी विरोधीपक्ष म्हणून सरकारला काही मदत हवी असेल तर ती देण्यास काँग्रेस पक्ष कधीही तयार असल्याचे पटोले यांनी बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा, हिजाब, हलाला, झटका या मुद्यांमुळे देशातील बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सुटत असतील तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत, पण यामुळे जर देशाचे मानसिक विभाजन होत असेल, देशात गुंतवणूक येत नसेल, देशातील बेरोजगारी वाढत असेल आणि एक समाज दुसर्‍या समजासमोर जर उभा राहत असेल तर हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे, असे पटोले म्हणाले.

देशात महागाईचा आलेख वाढत असून एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर १५.८ टक्क्यांपर्यंत गेला असून तो दहा वर्षांतील उच्चांक आहे. सलग तेरा महिन्यांपासून महागाईचा दर वाढत आहे. अन्नधान्य, डाळी, गहू, खाद्यतेल, इंधन, गॅस, भाज्या यांचे दर सामान्यांना परवडणारे राहिले नाहीत. बेरोजगारीने ४५ वर्षांतील उच्चांक केला आहे. सरकारी नोकर्‍या दिवसेंदिवस कमी होत असताना रेल्वेच्या ७२ हजार नोकर्‍या संपवण्यात आल्या आहेत. देश सध्या एका कठीण परिस्थितीतून जात असताना मंदिर-मशीद, हिजाब, हलाला या मुद्यांना महत्व दिले जात असून ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या भूमिकेची मोठी किंमत मात्र १३० कोटी जनतेला मोजावी लागत असल्याची टीकाही पटोले यांनी केली.

First Published on: May 19, 2022 4:30 AM
Exit mobile version