काँग्रेसचे विखे-पाटील मोदींच्या नगर सभेच्या नियोजनात व्यस्त?

काँग्रेसचे विखे-पाटील मोदींच्या नगर सभेच्या नियोजनात व्यस्त?

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि सुरू असलेल्या लाोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी, 12 एप्रिल रोजी नगरला होणार्‍या सभेच्या नियोजनात व्यस्त आहेत. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकजवळील संत निरंकारी भवन शेजारच्या प्रांगणात ही सभा होणार आहे. या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री व जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपच्यावतीने देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजूनही काँग्रेस पक्षात असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील या नियोजनात व्यस्त आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन पालकमंत्री राम शिंदे व भारतीय जनता पक्षाचे नेते करीत आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक सक्रिय काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले राधाकृष्ण विखे पाटील असल्याचे दिसून येते. नगर मतदारसंघात विजयाचा मार्ग त्यांच्यासाठी कठीण आहे.

काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांची ताकद असलेल्या नगरमध्ये विखे पाटील यांच्यासाठी अडचणींचा डोंगर आहे. यामुळे काँग्रेसचे स्टार प्रचारक असूनही अद्याप भाजपत प्रवेश न करता काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोदी यांची सभा व्यवस्थित व्हावी, यासाठी लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांची सभा शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता निरंकारी भवन येथे सुरू होईल. कार्यकर्त्यांना एकाच गेटद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. शिर्डी येथे विमानाने व तेथून तीन हेलिकॉप्टरने ते नगरला येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाकडून सदर दौर्‍याची तयारी सुरू आहे. सभेला अधिकाधिक गर्दी जमावी म्हणून विखे पाटील प्रयत्नाला लागले आहेत. विखेंची ताकद असलेल्या लोणी, प्रवरानगरहून लोकं जमवण्याची तयारी केली जात आहे.

नगरच्या निवडणुकीत आमची यंत्रणा कार्यरत आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या प्रचार सभेचे नियोजन भाजपचे पक्ष कार्यालय आणि नगरचे डॉ. विठ्ठलराव विखे मेडिकल कॉलेज आणि विखे फाऊंडेशनकडून केले जाते.
-डॉ. सुजय विखे पाटील, उमेदवार, भाजप

First Published on: April 10, 2019 6:04 AM
Exit mobile version