वादग्रस्त शाहिद बलवा, विनोद गोयंका होते ठाकरे सरकारच्या कमिटीवर, आशरांना होतोय विरोध

वादग्रस्त शाहिद बलवा, विनोद गोयंका होते ठाकरे सरकारच्या कमिटीवर, आशरांना होतोय विरोध

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. पण महाविकास आघाडीच्या काळातील बांधकामविषयक समितीवर वादग्रस्त बिल्डर शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांची नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

राज्याच्या विकासाला वेग देण्याच्या दृष्टीने केंद्राच्या निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. मित्रच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि शिवसेनेचे माजी आमदार डॉ. राजेश क्षीरसागर यांची शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी नियुक्ती केली आहे. अजय आशर हे ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून गेली काही वर्षे ते एकनाथ शिंदे यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयातील वावर वाढल्याचे सांगण्यात येते.

मात्र यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या एका वक्तव्याचा दाखला देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या नियुक्तीवर टीका केली आहे. या लुटारू व्यक्तीला मित्रसारख्या महत्त्वपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तर, शिवसेनेने देखील आशर यांच्या नियुक्तीबाबत ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील बिल्डर मित्र’ असा उल्लेख केला आहे.

तर, अलीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात, ‘टू जी’ स्पेक्ट्रम घोटाळ्यात सुरुवातीला जेलवारी केलेले आणि नंतर निर्दोष मुक्त झालेले शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांची रिअल इस्टेटच्या स्टेअरिंग समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती 12 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आली होती.

संयुक्त पुरोगामी आघीडी-2 सरकारच्या कारकिर्दीतील 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात डीबी रियाल्टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विनोद गोयंका आणि व्यवस्थापकीय संचालक शाहिद उस्मान बलवा हे आरोपी होते. पण नंतर दिल्लीतील न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध असल्याचे वारंवार बोलले जाते. बलवा आणि गोयंका या दोघांव्यतिरिक्त या समितीवर तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, तत्कालीन परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, मुख्य सचिव, महसूल, नगरविकास तसेच गृहनिर्माण विभागाचे सचिव आदी सदस्य होते.

दुसरीकडे, बांधकामविषयक समितीवरील नियुक्त्या या कायम वादातच राहिल्या आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतही विमल शहा आणि मुख्यमंत्री चव्हाण यांचे घनिष्ठ संबंध हेही त्याकाळी चर्चेत होते. तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि पत्राचाळ प्रकरणात सध्या अटकेत असलेले बिल्डर वाधवान बंधू यांच्या संबंधाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अजय आशर यांच्या नियुक्तीवरून काँग्रेस आणि शिवसेनेने घेतलेला आक्षेपला आता शिंदे गटाकडून काय उत्तर दिले जाते, हे पाहावे लागेल.

First Published on: December 3, 2022 11:41 AM
Exit mobile version