स्मार्ट सिटी कर्मचार्‍याचा करोनाने मृत्यू; पालिकेतील १८ कर्मचारी पॉझिटिव्ह

स्मार्ट सिटी कर्मचार्‍याचा करोनाने मृत्यू; पालिकेतील १८ कर्मचारी पॉझिटिव्ह

शहराची मुख्य जबाबदारी असलेल्या महापालिकेला करोनाने विळखा घालायला सुरुवात केली असून ‘स्मार्ट सिटी’च्या एका कर्मचार्‍याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय महापालिकेतील सुमारे १८ कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे स्वीय सहाय्यकांचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कर्मचार्‍यांची वाढती संख्या बघता गुरुवारी (दि. २५) करोना विषयावर होणारी ऑनलाईन महासभा देखील महापौरांनी पुढे ढकलली आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेतील नगररचना विभाग आणि आयुक्त कार्यालय नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या पद्धतीत अमुलाग्र सुधारणा केल्यामुळे आता नाशिक शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जाते. नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावताना दिसतात. संबंधित अधिकारी, कर्मचारी सुरक्षीततेची काळजी घेत असले तरीही त्यांच्या संपर्कात पॉझिटिव्ह पेशंट कधी येतील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्यातच आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे स्वीय सहाय्यक पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आयुक्तांचे दालन पूर्णत: सॅनिटाईज करण्यात आले. स्मार्ट सिटी कंपनीच्या पंचवटी कार्यालयातील शिपायाला ५ जूनला त्रास होऊ लागला. त्यामुळे तो हाफ डे घेऊन घरी गेला. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सुरुवातीला खासगी दवाखान्यात उपचार केल्यानंतर त्याला मविप्रच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्वसनाचा त्रास वाढल्याने त्याचा मंगळवारी (दि. २३) रात्री मृत्यू झाला. या कर्मचार्‍याची स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील यांच्या कक्षाबाहेर ड्युटी होती. कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर थवील हे कमालीचे व्यथीत झाल्याचे कळते. त्यांनी वैयक्तिक पातळीवर कर्मचार्‍याच्या उपचारासाठी मदत केल्याचे सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच नगररचना विभागातील एका कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या विभागातील २३ कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले. ज्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेले नाहीत त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले. उर्वरित काही कर्मचार्‍यांची करोना टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र हा विभागही आता तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम प्रभागातील विद्युत विभागातील एका चालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या चालकासोबत काम करणार्‍या तिघा कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच सिडको, सातपूर, पंचवटी या विभागीय कार्यालयातील स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार, वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिकेची मदार ज्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयावर आहे त्या रुग्णालयात तीन दिवसांत तब्बल ११ कर्मचार्‍यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात ३ सुरक्षा रक्षक, ४ सिस्टरसह, ब्रदर, क्लर्क, वॉर्डबॉय आणि शववाहिका चालकाचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी येथील सुरक्षाक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर एक महिला कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. महिलेच्या कुटुंबातील सात सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे कळते. रुग्णालयातील कर्मचारीच करोनाचे रुग्ण बनले तर या आजाराशी लढा कोण देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी मोरवाडी येथील रुग्णालयातील रुग्णवाहिकेचा चालक तसेच, तेथील एक सिस्टरचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

महापालिकेतील हे पॉझिटिव्ह पेशंट

महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत पुरेशी सुरक्षीततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. लोकप्रतिनिधींसह विविध भागांतील नागरिकांचा महापालिकेत नेहमीच वावर असतो. नागरिकांनी लक्षात घ्यावे की, महापालिकेची कर्मचार्‍यांना करोनाशी संबंधित विविध जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. मात्र हे कर्मचारीच पॉझिटिव्ह आढळून आले तर ही आजारावर नियंत्रण कोण आणणार? त्यामुळे नागरिकांनी मुख्यालयात वा विभागीय कार्यालयांत येऊन आपली कामे करण्यापेक्षा एनएमसी इ कनेक्ट अ‍ॅप्लीकेशनचा वापर करावा. त्यांच्या तक्रारींची दखल निश्चित घेतली जाईल. मुख्यालय नियमीतपणे सॅनिटाईज केले जात आहे. त्यामुे कर्मचार्‍यांचे मनोबल चांगले आहे. शहराचे काम सुरळीत ठेवण्यासाठी आमचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने नागरिकांनीही सहकार्य करावे ही अपेक्षा.
-राधाकृष्ण गमे, महापालिका आयुक्त 

First Published on: June 24, 2020 9:44 PM
Exit mobile version