वाढत्या कोरोनावरील उपाययोजनांसाठी केंद्राचे राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र

वाढत्या कोरोनावरील उपाययोजनांसाठी केंद्राचे राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्याप्रमाणेच देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने पत्र लिहिताना राज्यात आठवड्याला कोरोना चाचणीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात घटलेय, कोणत्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतेय, 10 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट कोणत्या जिल्ह्यात आहे यावर लक्ष्य दिले आहे. (corona increasing in maharashtra letter from center to state health secretary)

राज्यात येत्या काळात सण साजरे कले जाणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केंद्राने केले आहे. तसेच, रुग्णसंख्या जास्त येत असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा, पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग न वाढू देण्यासाठी प्रयत्न करा आणि केस मॅनेजमेंट करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले आहे. याशिवाय, पत्रात राज्याला १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख सतत वर-खाली होत आहे. रुग्णांच्या संख्येत होणार वाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. नागरिकांना लसीकरणासाठी संबंधित यंत्रणांकडून आवाहन केले जात आहे. तसेच, ज्यांच्या लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. त्याना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

महाराष्ट्रात मागील एका महिन्यात 2 हजार 135 सरासरी रुग्णसंख्या प्रति दिवस नोंद होते आहे. राज्यात शुक्रवारी 2 हजार 024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 2 हजार 190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या 11 हजार 906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 2 हजार 190 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78 लाख 95 हजार 954 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवाी 20 हजार 551 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 53 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – गोंदियातील बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, महिला अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

First Published on: August 6, 2022 4:27 PM
Exit mobile version