राज्यात लोकल, मंदिर, जीम बंदच राहणार

राज्यात लोकल, मंदिर, जीम बंदच राहणार

उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात लोकल, मंदिर आणि जीम बंदच राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी दुपारी राज्यातील जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मला गर्दी नकोय, असे सांगत लोकल, मंदिर आणि जीमबद्दल भाष्य केले. मुंबईत इतक्यात तरी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाही. राज्यांतर्गत ट्रेन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देऊ; पण लॉकडाऊनपूर्वी जशी लोकल सेवा सुरू होती, तशी लोकल सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही.

जीम सुरू करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली आखून देऊ. जीममध्ये व्यायाम करताना, हार्टचे पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोच्छवास वाढतो आणि त्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मंदिर उघडण्याची मागणी होत असली तरी जबाबदारी तुमच्यावर नाही, आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचे प्रेम आहे. तंगड्यात तंगडं घालून मंदिर बंद ठेवायची आमची इच्छा नाही. उघडलेल्या दारातून समृद्धी आली पाहिजे कोरोना नको, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याची मागणीही फेटाळून लावली आहे.

मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेणार

मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरुवात करतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. आरे कारशेडला माझा विरोध होता. तशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आरेतील जंगलासाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे. त्याचबरोबर आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे. कांजूरमार्ग येथे ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही. जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही. या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मेट्रो कर्मचार्‍यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्राचे कृषी धोरण तपासून स्वीकारू

केंद्र सरकारने जे कृषी धोरण मंजूर केलेले आहे. त्याचे फायदे किंवा त्याचे फटके आपल्याला काय बसतील? त्याबद्दल देखील विचार सुरू आहे. आपल्या हिताचे काय? शेतकर्‍यांच्या हिताचे काय? हे पाहिले जात आहे. आम्ही जे करू ते जनतेच्या हिताचे करू, शेतकर्‍यांच्या हिताचे करू. उगाचच काहीतरी कायदा आला आहे, म्हणून तो जसाच्या तसा.. चांगला असेल तर आनंदच आहे. पण जर का तसा नसेल तर मात्र या सर्व संघटनांशी आम्ही बोलतो आहोत. त्यांच्याकडून विविध सूचना येत आहेत. काही आक्षेप आहेत. काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे, यावर देखील विचार केला जात आहे. त्या सर्वांशी बोलून मग आपण या कृषी धोरणाबद्दल बोलूयात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

८० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे

राज्यातील ७० ते ८० टक्केे रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसंच, ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. पंरतु त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा राज्य सरकारने उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याचप्रमाणे जे सुरू केले ते पुन्हा बंद करावे लागू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत सहकार्य केले तसे यापुढेही करा, अशी साद उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घातली.

First Published on: October 12, 2020 12:03 AM
Exit mobile version