Hats Off राजेश टोपे! आई आयसीयूमध्ये मात्र चिंता राज्याची!

Hats Off राजेश टोपे! आई आयसीयूमध्ये मात्र चिंता राज्याची!

आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि त्यांच्या मातोश्री

चीन पासून सुरु झालेला करोनाचा प्रसार आता जगातील १५० देशात झाला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. एक-दोन रुग्णांचा अपवाद वगळता सर्व रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. मुंबई, पुणे सारख्या गजबजलेल्या, गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या शहरात करोनाचा फैलाव राज्य सरकारने रोखून धरलाय. मागच्या दोन आठवड्यापासून राज्याची जनता चिंतेत एक व्यक्ती मात्र डॉक्टर, विविध संस्था, माध्यमे यांच्या समोर येऊन धीर देतोय. ती व्यक्ती म्हणजे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे. विशेष म्हणजे करोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला, त्याच दरम्यान राजेश टोपे यांच्या मातोश्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या त्या आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांचा मुलगा राज्यावरील आलेल्या संकटाशी मोठ्या जबाबदारीने लढा देत आहेत.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा पहिल्यांदा राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत करोनाबाबत निवेदन दिले, तेव्हाच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक केले होते. घरातील अडचण विसरुन तुम्ही राज्यासाठी झटत आहात, असे गौरवोद्गार सभापतींनी काढले होते. आरोग्य मंत्री असूनही टोपेंनी आपल्या आईच्या काळजीसोबतच सध्या आपल्या जबाबदारीला प्राथमिकता दिलेली आहे. करोनाचा उद्रेक झाल्यापासून ते सकाळी काही मिनिटे आईची विचारपूस करतात आणि मग पुर्ण दिवस ते करोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या कामास स्वतःला झोकून देतात. पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडल्यापासून आरोग्य खात्याच्या बैठका, विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची धावपळ, चाचणीचे किट मिळावे म्हणून केंद्राकडे पाठपुरावा, निधीची तरतूद अशे आव्हाने टोपेंनी लिलया पेलली आहेत.

१४ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे दोघेच माध्यमामध्ये दिसत आहेत. स्टेज ३ मध्ये आपण जाऊच नये, यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रसंगी अनेक कठोर निर्णयही त्यांनी मोठ्या सहजतेने घेतले आणि तेवढ्याच नाजुकपणे लोकांना समजावूनही दिले. माध्यमांसमोर बोलताना कधीही त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत नाही. पत्रकारांच्या प्रत्येक तिरकस प्रश्नांचेही ते शांतपणे निरसन करताना आपण त्यांना पाहिले. गेल्या काही दिवसांपासून टोपे अवघ्या दोन ते तीन तासांची झोप घेत आहेत. प्रवासात गाडीतच जेवण घेत आहेत, अशी माहिती टोपेंच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आढावा घेताना

विशेष म्हणजे राजेश टोपे हे बी.ई. मॅकेनिक आहेत. इंजिनियर असलेले टोपे यांनी आपल्या खात्याचा आणि करोना या संकटाचा इतका सुश्म अभ्यास केला आहे की, तेच डॉक्टर असावेत अशी समजूत होते. टोपेंनी जी धडाडी दाखवली त्याचे कौतुक करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांना सुपरमॅन म्हणून संबोधले.

राजेश टोपे यांची पार्श्वभुमी

राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून १९९९ पासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. २००१ साली पहिल्यांदा त्यांनी राज्यमंत्रीपदाची तर २००४ पासून ते २०१४ अपवाग वगळता सतत कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष पार पाडली होती. मात्र सार्वजनिक आरोग्य खाते मिळाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. टोपेंचे वडील स्व. अंकुशराव टोपे हे देखील माजी आमदार आणि खासदार राहिलेले आहेत. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी अंकुशराव एक होते. आपल्या वडिलांचे संस्कार आणि शरद पवारांची कामातील निपुणता हे गुण मी माझ्या अंगी बाणवले असल्याचे टोपे नेहमी सांगतात. त्याची प्रचिती आपल्याला त्यांच्या कामातून दिसून येत आहे.

राजेश टोपे यांनी पुण्यातील NIV संस्थेला भेट दिली.
First Published on: March 19, 2020 5:00 PM
Exit mobile version