गंभीर परिस्थिती! बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

गंभीर परिस्थिती! बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

आत्महत्या

राज्यासह पुण्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर याचा ताण आला आहे. बऱ्याच रुग्णांना बेड देखील मिळत नसल्याचा घटना दिवसेंदिवस समोर येत आहे. अशाच एका कोरोनाबाधित महिलेला बेड न मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने वारजे माळवाडी परिसरातील एका रुग्णालयावर आरोप केला आहे. ‘आपल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास रुग्णालयाने नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे’. मात्र, डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावले असून उपचारानंतर या महिलेला डिस्चार्ज दिला त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या पतीने सांगितले की, ‘२ एप्रिल रोजी त्याच्या पत्नीमध्ये कोरोनाची काही सौम्य लक्षणे आढळून आलीत. त्यानंतर तिच्या लक्षणात वाढ झाल्यानंतर तिला ८ एप्रिल रोजी वारजे माळवाडी येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, महिलेला ११ एप्रिललाच डिस्चार्ज देण्यात आला.’ पत्तीच्या म्हणण्यानुसार, ‘तिच्यावर आणखी काही दिवस उपचार करण्याची गरज होती. मात्र, रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला आणि त्याच रात्री महिलेला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याचे महिलेच्या पतीने सांगितले’. त्यानंतर पती पुन्हा दुसऱ्या दिवशी महिलेला रुग्णालयात घेऊन गेला. त्यावेळी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत महिलेला पुन्हा दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आल. यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, महिलेच्या पतीने रुग्णालयात बेड देण्यास नकार दिल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच डॉक्टरांनी सांगितले की, ‘त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांना ऑक्सिजनची गरज पडली नाही. तसेच सटी स्कॅनसाठीही सांगितले नाही. कारण महिलेची ऑक्सिजन लेवल ९७ हून अधिकच होती. तसेच त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची देखील आवश्यकता नव्हती. ही महिला उपचारानंतर बरी झाली होती. त्यामुळे इतर रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन द्यायचा असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला’.


हेही वाचा – फडणवीसांनी साडेचार कोटींची रेमडेसिवीर कोणत्या अकाउंटमधून खरेदी केली?


First Published on: April 19, 2021 2:19 PM
Exit mobile version