राज्यात कोरोनाचे संकट आणखी गडद; अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या पाऊण लाखाजवळ

राज्यात कोरोनाचे संकट आणखी गडद; अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या पाऊण लाखाजवळ

Coronavirus India : 'या' राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ८४ टक्के नव्या रूग्णांची नोंद

राज्यावरील कोरोनाचे संकट गडद होताना दिसत असून शनिवारी पुन्हा एकदा राज्यात ८ हजारांवर नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पाऊण लाखांच्या जवळ पोहोचल्याने ही खूप मोठी धोक्याची घंटा ठरली आहे. अमरावती व अचलपूर या शहरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून या दोन्ही शहरांत ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत मोठी कोरोना रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावले जात असले तरी रुग्णसंख्येला ब्रेक लागत नसल्याने चिंता वाढू लागली आहे. दुसरीकडे मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांतही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता बळावत चालली आहे.

राज्यात गेले काही दिवस सातत्याने आठ हजारांवर नवीन बाधित आढळत आहेत. त्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ७२ हजार ५३० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १३ हजार ६९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल ९ हजार ७६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत. मुंबईत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ८० झाली आहे तर ठाण्यात हा आकडा ७ हजार ६६५ इतका झाला आहे. कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरलेल्या अमरावती जिल्ह्यात सध्या ६ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शनिवारी ५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात शनिवारी ५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे ५२ हजार ९२ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर २.४३ टक्के एवढा आहे. राज्यात शनिवारी ८ हजार ६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण २० लाख २० हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात ३ लाख ३४ हजार १०२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

First Published on: February 28, 2021 3:00 AM
Exit mobile version