Gram Panchayat Election: कोरोनाबाधितालाही बजावता येणार मतदानाचा हक्क

Gram Panchayat Election: कोरोनाबाधितालाही बजावता येणार मतदानाचा हक्क

प्रातिनिधीक फोटो

कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी म्हणजे उद्या मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेत कोरोनाची लागण झालेल्या, मात्र क्वारंटाईन असलेल्या मतदारांना देखील या निवणुकीत हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीने निवडणूक विभागाने विशेष व्यवस्था देखील केली आहे. मतदान करताना मतदान केंद्रावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण व्हावे, म्हणून पीपीई कीट देण्यात येणार आहेत. तर ठराविक वेळेत कोरोनाबाधित मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

मतदान संपण्याच्या आधी अर्धातास कोरोनाबाधित मतदारांना मतदान करता येणार आहे. यासह कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी मतदान करता येणार आहेत. यासह प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

यासह मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीला मास्क लावणे, कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. तसेच मतदान केंद्रावर त्याची ओळख पटावी म्हणून आरोग्य विभागाकडील बाधितांच्या यादीतील नाव आणि त्यांच्या ओळखपत्राची पडताळणी देखील याठिकाणी करता येणार आहे. येत्या १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. तर, १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.

First Published on: January 14, 2021 12:01 PM
Exit mobile version