कोरोनायोध्दे डॉ. नागरगोजे, डॉ. पलोड पॉझिटिव्ह; पालिकेत ‘टेंशन’

कोरोनायोध्दे डॉ. नागरगोजे, डॉ. पलोड पॉझिटिव्ह; पालिकेत ‘टेंशन’

Dr. Bapusaheb Nagargoje - Dr. Aavesh Palod

कोरोना नियंत्रणाची जबाबदारी ज्यांच्या शिरावर मुख्यत: आहे ते महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा चार्ज डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेची वैद्यकीय विभागातील सहाय्यक वैद्यकीय अधिकार्‍यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
महापालिकेच्या मुुख्यालयाला आता कोरोनाचा विळखा पडायला सुरुवात झाली आहे. मुख्यालयात सातत्याने अभ्यंगतांची वर्दळ असल्याने त्यातून प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कोरोना योध्दा म्हणून ओळख असलेले डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि डॉ. आवेश पलोड यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे रिपोर्ट गुरुवारी (दि. २५) पॉझिटिव्ह आले. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा डोलाराच कोसळतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे. डॉ. नागरगोजे यांचा चार्ज डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच महापालिका मुख्यालयातच कोणतीही लक्षणे नसणारे १४ सुपर स्प्रेडर्स आढळले, तर शहरात किती असतील, असा प्रश्न उपस्थित झाला असून, महापालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांशी कायमचा संबंध येत असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी यांना आरटी-पीसीआर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार १५ मार्चपासून महापालिकेत अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. शनिवारपर्यंत १९९ अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका सहायक वैद्यकीय अधिकार्‍यासह काही कर्मचारी व अधिकार्‍यांचे वाहनचालक यांचा समावेश आहे.शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करोना नियंत्रणाचे मोठे आव्हान वैद्यकीय विभागासमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी वैद्यकीय विभागातील अधिकारी, डॉक्टर दिवस-रात्र कार्यरत असतानाच आता वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी यांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय विभागाला धक्का बसला आहे. शहरातील करोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची जबाबदारी सध्या या वैद्यकीय अधिकार्‍याकडे आहे. मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात हा अधिकारी आल्याने वैद्यकीय विभागाचे टेन्शन वाढले आहे. संबंधित अधिकार्‍यास लक्षणे नसली, तरी ते सध्या होम क्वारंटाइन झाले आहेत.

 

 

 

First Published on: March 25, 2021 2:31 PM
Exit mobile version