परदेशात २७६ भारतीयांना करोना

परदेशात २७६ भारतीयांना करोना

करोना व्हायरस

भारतात करोनाची १५१ जणांना लागण झाली असताना एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. परदेशात असलेल्या एकूण २७६ भारतीयांना करोना विषाणूंचा संसर्ग झाला असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. परदेशातील करोनाग्रस्त भारतीयांपैकी एकट्या ईराण देशात २५५ भारतीय आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, परदेशात असलेल्या एकूण २७६ भारतीय नागरिकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. ईराणमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये २५५ भारतीय करोनाग्रस्त आहेत.

या व्यतिरिक्त हाँगकाँगमध्ये १, इटलीत ५, कुवैत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी १ आणि सौदी अरबमध्ये १२ भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ईराणची राजधानी तेहरान येथून एकूण २०१ भारतीयांना बुधवारी विशेष विमानाने भारतात परत आणले आहे. आतापर्यंत ईराणमधून एकूण ५०९ भारतीयांना परत आणले आहे. या सर्व लोकांना राजस्थान येथील जैसलमेर येथे विलगीकरणात ठेवले आहे.

जगभरात करोनाचे किती बळी?
करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षात घेता चीनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये एकूण ३२३७ लोकांचा बळी गेला आहे. तर, इटलीत मृतांचा आकडा जलदगतीने वाढतो आहे. या व्यतिरिक्त, ईराणमध्ये ९८८, स्पेनमध्ये ५३३, फ्रान्समध्ये १७५, अमेरिकेत ११२, ब्रिटनमध्ये ७१, दक्षिण कोरियात ८४, नेदरलँडमध्ये ४३, जपानमध्ये २९, स्वित्झर्लंडमध्ये २७, भारतात ३, जर्मनीत २६, फिलिपाईन्समध्ये १४ आणि इराकमध्ये ११ लोकांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

First Published on: March 19, 2020 7:02 AM
Exit mobile version