राज्यातील प्रत्येक घराघरात कोरोनाचे ट्रेसिंग होणार

राज्यातील प्रत्येक घराघरात कोरोनाचे ट्रेसिंग होणार

येत्या १५ सप्टेंबर नंतरच्या काळात मी महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम राबवू इच्छितो, त्याच्यात मला आपली सगळ्यांची मदत, सहकार्य पाहिजे. आपण “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” असे ठेवत आहोत. राज्यातील जनतेला आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाची सांगता करताना जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यंत्रणांवरील ताण थोडासा हलका करतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घराचे ट्रेसिंग करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन राज्यातील जनतेला केले. मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या समारोपाच्यावेळी सर्वपक्षीय सदस्यांचे धन्यवाद देखील मानले.

मधल्या काळामध्ये आपण अधिवेशन कधी घ्यावे, या विषयावर चर्चा केली आणि दोन दिवस अधिवेशन घेण्याचे ठरले. दोन्ही दिवस अत्यंत शांतपणे, शिस्तीने, समजूतदारपणे, सामंजस्याने विरोधी पक्षाने आणि सर्व पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी शासनाला सहकार्य केले, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सूचना देताना सांगितले आहे की, अनावश्यक असेल तर बाहेर जाऊ नका, बाहेर गेला तर तोंडावर मास्क अत्यावश्यक आहे, हात धूत राहणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे या गोष्टी आहेतच. येत्या १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील एकही घर असं राहु द्यायचं नाही की जिथे आरोग्य सेवक, महसूल यंत्रणा, नगरपालिका, महापालिका, ज्या यंत्रणा आहेत त्यातील सगळी माणसे, त्यांनी प्रत्येक घरात जाऊन चौकशी करायची आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी स्वीकारली तर एकूणच सगळ्या यंत्रणेवरील ताणतणाव कमी होईल, कारण यंत्रणासुद्धा अथक परिश्रम करते, अहोरात्र मेहनत करते असे मनोगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले.

मास्क हीच आपली लस आहे

महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण निर्माण केला, १५-२० दिवसांत फील्ड हॉस्पिटल निर्माण केले, नंतर जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्स निर्माण केले. टास्क फोर्स सोबतच कोरोना दक्षता समिती गावागावांमध्ये निर्माण करण्यासाठी मी सूचना केल्या आहेत. आज सुद्धा आपल्याकडे औषध नाही, लस कधी येणार याची कल्पना नाही, आशेवर आपण दिवस ढकलत चाललो आहोत. आता तरी आपल्या हातामध्ये आपला मास्क हीच आपली लस आहे. सतत हात धुत राहणे, एकमेकांपासून दूर राहणे या सगळ्या गोष्टीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्विकारल्या पाहिजेत असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यापुढेही गाफील राहून चालणार नाही 

मार्चमध्ये जेव्हा या संकटाला सुरुवात झाली, तेव्हा राज्यात फक्त ३ टेस्ट लॅब होत्या.आता सगळ्या एकत्र केल्या तर ५३० च्या आसपास टेस्ट करणाऱ्या लॅब आपण राज्यात निर्माण केल्या आहेत. सुरुवातीच्या काळात ७७००च्या आसपास रुग्णशय्या होत्या, त्या आता किमान ३.५ लाखाच्या आसपास वाढविलेल्या आहेत. डिसेंबरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, जवळपास २९.५ लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करू शकलो आहोत. तसेच येत्या वर्षभरामध्ये साधारणत: ६.५ लाख आदिवासी आणि कुपोषित बालकांना आपण मोफत दूध भुकटी देणार आहोत. WHOने संपूर्ण जगाला इशारा दिला आहे की कोरोनाचे संकट लवकर जाईल असे वाटत नाही, पण इशारा हा आहे की पुढच्या अजून मोठ्या महामारीला अधिक सज्जतेने तयार रहा. याचा अर्थ असा की आपल्याला कुठेही शिथिलता किंबहुना गाफील राहून चालणार नाही, प्रत्येक पाऊल समजूतदारपणे व दक्षतेने टाकावे लागणार आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले. मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला धन्यवाद देत आहे, कारण मी सुरुवातीलाच म्हंटले होते की हे संकट म्हणजे विषाणू बरोबरचे आपले युद्ध आहे. या युद्धामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे मैदानात उतरले यासाठी मुख्यमंत्र्यांनी साऱ्यांचेच यावेळी आभार मानले.

First Published on: September 8, 2020 7:45 PM
Exit mobile version