CoronaVirus : पुढचे २ आठवडे आपल्यासाठी महत्त्वाचे – मुख्यमंत्री

CoronaVirus : पुढचे २ आठवडे आपल्यासाठी महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे असतील असं सांगितलं आहे. ‘जगभरात करोनाचा कसा प्रसार झाला, याकडे आपण पाहिलं, तर पहिल्या दोन आठवड्यांमध्ये त्याचा फैलाव संथ झाल्याचं दिसून आलं, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात करोना वेगाने पसरतो. त्यामुळे आता आपल्याकडे पहिला रुग्ण आढळून १० दिवस उलटले आहेत. त्यामुळे आपले पुढचे दोन आठवडे सुरू झाले आहेत. यादरम्यान, मंदिरं, मशिदी, चर्च अशा सगळ्याच धार्मिक ठिकाणांना विनंती आहे की काही दिवस या ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. चौपाटीवर जाणं टाळा’, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

सूचना रंगवलेली ट्रेन येणार!

‘अभावाने एखादाच देश राहिला असेल, जिथे करोनाचा प्रादुर्भाव राहिलेला नाही. त्यामुळे हे जागतिक संकट आहे. पहिल्या २ आठवड्यांमध्ये संथ वाढ झाली, पण पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात खूप वेगाने वाढ होते. राज्यात करोनाची आणखी वाढ होण्याआधी आपण त्याला परतवून लावू शकतो. आवश्यक त्या सर्व उपाययोजना आपण केल्या आहेत. आज दुपारी मी, आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी मिळून राज्यभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. रेल्वे, एसटी, बसच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. काय करावं आणि काय करू नये यासाठीचं एक डिझाईन त्यांना दिलं जाईल. या सूचना रंगवलेली ट्रेन लवकरच सुरू केली जाईल’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सगळ्याच गोष्टींसाठी कायदा करणार का?

‘आम्ही ज्या गोष्टी करतोय, त्या जनतेच्या हितासाठी करत आहोत. जनता स्वत:हून पुढे येऊन शिस्त पाळेल, अशी अपेक्षा आहे. खोकताना-शिंकताना रुमाल ठेवा, कुठेही थुंकू नका अशा गोष्टींसाठी कायदा बनवता येणार नाही’, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

अर्थव्यवस्थेची काळजी घेऊ

दरम्यान, करोनाच्या फैलावाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असून त्याविषयी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ‘अर्थव्यवस्थेवर परिणाम हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मंदी सुरू असताना हे संकट आलं आहे. राज्यातल्या सचिव आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आर्थिक फटका बसण्याच्या धोक्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांना करोनावर फोकस करायला सांगितलं नाही’, असं ते म्हणाले.

First Published on: March 16, 2020 6:37 PM
Exit mobile version