corona Virus third wave: नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना रुग्णसंख्या २ लाखांवर जाण्याची शक्यता?, आरोग्य सचिवांचा इशारा

corona Virus third wave: नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना रुग्णसंख्या २ लाखांवर जाण्याची शक्यता?, आरोग्य सचिवांचा इशारा

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्य सरकार देखील अलर्ट झाले असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाची साखळी पुन्हा रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जारी केलेल आहेत. परंतु महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर जाण्याची शक्यता असल्याचे आरोग्य सचिवांनी म्हटलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या बाधितांची संख्या देखील वाढते आहे. सध्या सापडणाऱ्या रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत असल्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असल्याचे आरोग्य सचिवांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच रुग्णसंख्या वाढतच राहिल्यास जानेवारीमध्ये २ लाखांच्यापुढे कोरोना रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाबाबतही आरोग्य सचिवांनी माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. ओमिक्रॉनचा धोका नाही परंतु हा व्हेरिएंट सौम्य आहे असे समजू नका. ज्या व्यक्तींनी अद्याप लसीकरण केले नाही किंवा जे आजारी आहेत अशा नागरिकांना ओमिक्रॉनची लागण होऊ शकते आणि तो धोक्याचा ठरु शकतो. असे झाल्यास तो कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असेल आणि यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल असे आरोग्य सचिवांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे लसीकरण वेगाने करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या गुणाकार स्वरुपात वाढत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी राज्यात ८ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत ५ हजार ६३१ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाविरोधातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे.


हेही वाचा : Florona: कोरोना ,डेल्टा आणि ओमिक्रोन नंतर आता आला फ्लोरोना


 

First Published on: January 1, 2022 12:37 PM
Exit mobile version