Coronavirus: नागपुरात २ दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा

Coronavirus: नागपुरात २ दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. नागपुरात कोरोनाची स्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याने जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

दोन आठवड्यांसाठी हा कर्फ्यू लागू

शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. आज महापालिकेत नागपूरचे महापौर संदीप जोशी तसंच आमदारांची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासह कोरोना स्थिती संदर्भात बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवार असे दोन जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली. दोन आठवड्यांसाठी हा कर्फ्यू लागू असणार आहे. महिनाअखेरीस बैठकीदरम्यान कालावधी वाढवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

जनता कर्फ्यू कठोरपणे पाळण्याचा निर्णय

याबैठकीत महापौरांनी असे सांगितले की, “लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील पदाधिकारी, विरोक्षी पक्षनेते यांची आयुक्तांसोबत बैठक पार पडली. बैठकीत लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाली. लोकप्रतिनिधींची लॉकडाउन संदर्भात मागणी होती. आयुक्तांचं मात्र मत वेगळं असून लॉकडाउन लावणं हिताचं नाही असं त्यांनी सांगितलं, लॉकडाउन लावल्यास अडचणी वाढतील असे मत त्यांनी व्यक्त केले. तसंही लॉकडाउन लावण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे”.

तसेच “चर्चा करुन शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. येणारे पुढील दोन शनिवार-रविवार जनता कर्फ्यू कठोरपणे पाळण्याचा निर्णय झाला आहे. शनिवारी रात्री ते सोमवारी सकाळी साडे सात वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागू असणार आहे. यानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल,” असे संदीप जोशी यांनी सांगितले.

परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय होणार

दरम्यान, नागपूर महानगर पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हा निर्णय जाहीर केला आहे. या दोन दिवसांच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. किराणा, भाजी आणि डेअरी तसेच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील. शनिवार आणि रविवारची परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे. यासह दुसरीकडे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात किमान १४ दिवसांचा लॉकडाउन असणे आवश्यक आहे, असे मत शहरातील डॉक्टरांनी उच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे.


“प्रशासन संवेदनशील हवं, हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.”; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

First Published on: September 16, 2020 8:49 PM
Exit mobile version