कोरोना हॉस्पिटलवरून डोंबिवलीत रंगलय राजकारण; सेना-मनसेत सोशल वॉर

कोरोना हॉस्पिटलवरून डोंबिवलीत रंगलय राजकारण; सेना-मनसेत सोशल वॉर

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच कल्याण डोंबिवलीतही कोरोनाबाधित रूग्णांनी शंभरी पार केली आहे. एकिकडे पालिका प्रशासन कोरोनाशी दोन हात करून लढत असतानाच दुसरीकडे डोंबिवलीतील आर. आर. हॉस्पीटलवरून शिवसेना आणि मनसेमध्ये राजकारण रंगल्याचं दिसून येतंय. मनसे आमदार राजू पाटील यांनी १० लाख रूपये भाडे मिळणार असल्यानेच हॉस्पीटल दिल्याचा संदेश आणि त्याचा करारानामा सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत सोशल वॉर सुरू झालं आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वत:चे आर. आर. हॉस्पीटल कोरोनाबाधित रूग्णांसाठी दिल्याने मनसेचे वजन वाढलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही मनसेने हॉस्पीटल दिल्याने आमदार पाटील हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्या अगोदर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महापालिकेचा निऑन हॉस्पीटलशी करार करून ते कोरोनाबाधित रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला निऑन हॉस्पीटलमधून आर. आर. हॉस्पीटलमध्ये शिप्ट करण्यात आले होते. मात्र आर. आर. हॉस्पीटलमध्ये कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाहीत, असा मेसेज त्यांनी सोशल मिडीयावर टाकला होता. त्यानंतर शिवसेना-मनसेत सोशल वॉर रंगल्याचे दिसून आले.


हेही वाचा – मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता – राजेश टोपे


शिवसेनेकडून हे सोशल वॉर सुरू झाल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ही शिवसेनेवर निशाना साधला आहे. २०/२५ वर्ष सत्तेत असताना आता पर्यंत २० हजार कोटीच्यावर अर्थसंकल्प या शहरांवर खर्च करताना एक सुसज्ज रुग्णालय या दोन्ही शहरांसाठी बांधता आलेलं नाही. सत्तेत मंत्रीपद भोगून सुद्धा एखादे मेडिकल कॉलेज बांधता आलं नाही. ही वस्तुस्थिती लोकांना दाखवून द्यायची नाही म्हणून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे केविलवाणे उद्योग चालू आहेत. असा पलटवार पाटील यांनी केला आहे. कोणतीही मागणी केलेली नसताना पालिका प्रशासनाने त्यांच्या धोरणानुसार देऊ केलेल्या कराराचे केवळ आर. आर. हॉस्पिटलचा करारनामा समाजमाध्यमांमध्ये फिरवून बदनामी करण्याच्या प्रकाराची मला कीव येते. इथल्या सत्ताधा-यांनी आरोग्य सेवेची केलेली वाताहत याचा समाचार घेणार आहे. पण ही वेळ कोरोनाशी लढण्याची आहे, फालतू राजकारण करण्याची नाही, असेही आमदार पाटील यांनी प्रसिध्दी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मात्र शिवसेनेचे पदाधिकारी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. शिवसेनेच्या सोशल वॉरमध्ये भाजपचाही मोठा हात असल्याचे बोललं जातंय.

 

First Published on: April 25, 2020 8:31 PM
Exit mobile version