गेल्या ७० वर्षात देशाला अपेक्षित यश मिळाले नाही – सरसंघचालक

गेल्या ७० वर्षात देशाला अपेक्षित यश मिळाले नाही – सरसंघचालक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

स्वातंत्र्योत्तर काळात नव्याने उभा राहणारा भारत, जगात अस्तित्त्वात आलेला इस्त्राईल आणि अणवस्त्र हल्ला झेलणारा जापान यांनी जवळपास एकाच कालखंडात विकासाची वाट धरली होती. या दोन देशांच्या प्रगतीशी तुलना केल्यास भारताला गेल्या ७० वर्षात अपेक्षित यश मिळू शकले नाही असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील सुरेश भट सभागोजित प्रहार मिल्ट्री स्कुलच्या रजत जयंती समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

पाच मोठ्या लढाया लढल्या

यावेळी डॉ. भागवत म्हणाले की,”स्वातंत्र्योत्तर काळात भारतात काहीच चांगले झाले नाही असे म्हणणे अयोग्य होईल. कुठलाही देशभक्त नागरिक असे म्हणू शकणार नाही. परंतु, १९४८ साली अस्तित्त्वात आलेल्या इस्त्राईलने पुढल्या ४० वर्षात ५ मोठ्या लढाया लढल्या. आज संरक्षण आणि कृषि क्षेत्रात ईस्त्राईलचा दबदबा आहे. तर दुस-या महायुद्धात अणवस्त्र हल्ला झेलणा-या जपानने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जबरदस्त मुसंडी मारली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाच्या तिजोरीत ३० हजार कोटी रुपयांची गंगाजळी होती. परंतु, आम्ही ईस्त्राईल व जपानच्या तुलनेत अपेक्षित यश मिळवू शकलो नाही.”

राष्ट्र चरित्राच्या निर्मितीची गरज

जमिनीचा तुकडा आणि माणसांची गर्दी म्हणजे देश नसतो. जल, जमीन,जंगल आणि जनतेच्या संयोगातून देशाची उभारणी होत असते. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे अनेकांना अजूनपर्यंत देश या संकल्पनेबाबत ठोस निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळेच आपल्याकडे “भारत तेरे टुकडे होंगे” अशा घोषणा देणा-यांची बाजू घेणारा देखील एक वर्ग आहे. भारत हा तरुणांचा देश असून मनुष्य तारुण्यावस्थेत सर्वाधिक साहसी असतो. त्यामुळे ज्यांच्याकडे ‘होश’ आहे अशा लोकांवर ‘जोश’ असलेल्या तरुणांचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे. देशभक्ती ही कुणाची मक्तेदारी असू शकत नाही. त्यामुळे हा देश आपला असून त्यासाठी जगणे आणि प्रसंगी बलिदान करणे ही आमची जबाबदारी आहे अशी भावना तरुण पिढीत रुजवली गेली पाहिजे. अशा प्रकारच्या राष्ट्र चरित्राची निर्मीती झाली तरच भारत विश्वगुरू बनेल असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला.

First Published on: January 17, 2019 10:18 PM
Exit mobile version