राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा आरोप असलेले धुळ्याचे सुनील पाटील कोण आहेत?

राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा आरोप असलेले धुळ्याचे सुनील पाटील कोण आहेत?

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात धुळ्याच्या सुनील पाटील यांचं नाव आल्याने आणि त्यांचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसशी असल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. सुनील पाटील हे धुळ्याचे असले तरी गेली अनेक वर्षे ते मुंबईलाच वास्तव्याला आहेत. सुनील पाटील यांचे उच्च पदस्थ अधिकारी आणि अनेक राजकारणी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. सुनील पाटील हे मध्यस्थाची भूमिका बजावत आले आहेत. न घडून येणार्‍या गोष्टी घडवून आणणे किंवा एखाद्या विषयाचे अथवा व्यक्तीचे पाळेमुळे शोधून आणणे यात त्यांचा हातखंडा आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवनवे खुलासे होत असून या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन गौप्यस्फोट करत आहेत. अशातच भाजपच्या मोहित भारतीय यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यातून हवा काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचे मास्टरमाईंड सुनील पाटील असून त्यांचा राष्ट्रवादी कांग्रेसशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंभोज यांनी केला आहे.

सुनील पाटील हे धुळे शहरापासून अवघे दहा कि.मी. अंतरावर असलेल्या गावचे रहिवाशी आहेत. सुनील पाटील यांचं नाव सुनील चौधरी पाटील असं आहे. त्यांच्या गावी त्यांना सुनील चौधरी म्हणून ओळखतात. मात्र ते त्यांच्या पुर्वजांना मिळालेल्या ‘पाटीलकी’मुळे पाटील आडनाव लावतात. आजही धुळ्यातील टेकडी परिसिरात त्याचे आई-वडिल व अन्य सदस्य राहतात. याठिकाणी त्यांचा बंगलाही आहे.

तथापि, सुनील पाटील यांचे संबंध हे अनेक राजकीय नेत्यांशी देखील आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे ते निकटवर्तीय होते असं बोललं जात आहे. तसंच, राज्याचे माजी गृहमंत्री जे आता मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख यांच्याशी देखील संबंध असल्याचे समजते. आर. आर. पाटील यांच्यासोबत जे अधिकारी होते, तेच अधिकारी अनिल देशमुख यांच्यासोबत होते. या अधिकाऱ्यांसोबत सुनील पाटील यांचे चांगले संबंध आहेत. तसंच अनिल देशमुख यांच्या ईडी प्रकरणात सुनील पाटील नाव आलं होतं. ते सुनील पाटील हेच असल्याचं बोललं जात आहे. याच्या मदतीने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि भाचा सत्यजीत देशमुख या दोघांच्या मदतीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण होत होती, असं ईडीच्या चौकशीत समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान केसमध्ये सॅम डिसुझाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर गेले काही दिवस बेपत्ता असलेला सॅम डिसुझाने एका वृत्त वहिनीला मुलाखत दिली. यात त्याने सुनील पाटील यांचं नाव घेतलं. दरम्यान, शनिवारी मोहित भारतीय यांनी सुनील पाटील यांचे संबंध राष्ट्रवादीशी असल्याचा आरोप करत ते धुळ्याचे असल्याचं सांगितलं.

दरम्यान, मोहित भारतीय यांच्या आरोपानंतर सुनील पाटील यांचे भाजपच्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल होत आहेत. याशिवाय, फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला आणि क्रूझ ड्रग्ज प्रकरण एनसीबीचा पंच असलेला किरण गोसावी तसंच मनीष भानुशाली याच्यासोबतचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

 

First Published on: November 6, 2021 4:33 PM
Exit mobile version