शिर्डी संस्थानात लाखोंचा घोटाळा

शिर्डी संस्थानात लाखोंचा घोटाळा

शिर्डी येथील साई संस्थान

महाराष्ट्रातील श्री साई संस्थानात लाखोंचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. श्री साई संस्थान शिर्डी यांच्याकडून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध वस्तू खरेदीत ६६ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने आज पत्रकारपरिषदेत केला. अहमदनगर येथे २०१५ साली आयोजित करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आला होता. पोलिसांच्या मागणीनुसार सुरक्षतेसाठी साहित्य खरेदी करण्यात आली. यामध्ये अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाने श्री साई संस्थांन यांना दिलेल्या अंदाजित दरापेक्षा चढ्या दराने साहित्य खरेदी करण्यात आल्याचा आरोप हिंदू जनजागृती संस्थानाने केला आहे.

या साहित्य खरेदीत भ्रष्टाचार

६० हजारांचा मनिला रोप (दोर) १८ लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्यात आला. तर, ४०० रुपये प्रति नग असलेले रिचार्जेबल टॉर्चेस ३ हजार रुपये प्रति नग प्रमाणे विकत घेण्यात आले. त्याचप्रमाणे ५ हजारांची ताडपत्री २२ हजार ५७५ रुपयांना विकत घेण्यात आली आहे. अतिशय चढ्या दराने एकूण ६६ लाख ५५ हजार ९९६ रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनात आले आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी

याबरोबरच २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी पोलिसांकडे सोपवलेल्या वस्तू अजूनही संस्थानाने स्वत:कडे जमा करून घेतलेल्या नाहीत. खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंचा वापर २०१८ मध्ये होणाऱ्या साई महासमाधी शताब्दी सोहळ्यासाठी होईल, असे आरटीआयच्या माध्यमातून साई संस्थानाने कळविले असल्याचे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे. पण २०१५ च्या वस्तू २०१८ मध्ये वापरणे हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप समितीने केला आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी, साहित्याचा प्रत्यक्ष साठा मोजून, घोटाळ्याची चौकशी करून दोषी पोलीस कर्मचारी आणि संस्थानाचे कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली विधी आणि न्याय खात्याच्या अंतर्गत येत असलेला हा सर्व व्यवहार एकूणच संशयास्पद असून कायदा आणि सुव्यस्था हे शासनाचे दायित्व आहे. भक्तांच्या कष्टातून आलेला निधीत अपहार होत असेल तर राजकीय पक्षांचा निधी हा निवडणुक व्यतिरीक्त अन्य समाजकार्यासाठी का वापरला जाऊ नये ? असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीने केला आहे.

First Published on: May 24, 2018 12:29 PM
Exit mobile version