प्रेयसीला प्रेमात धोका देणे गुन्हा ठरू शकत नाही

प्रेयसीला प्रेमात धोका देणे गुन्हा ठरू शकत नाही

शरीरसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीला प्रेेमात धोका देणे हे नैतिकदृष्ठ्या कितीही वाईट असले तरी तो गुन्हा ठरू शकत नाही, असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. तसेच लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णयही हायकोर्टाने कायम ठेवला आहे.

एका व्यक्तीने विवाहाचे अमिष दाखवून आपल्यावर वारंवार बलात्कार केला, असा आरोप एका महिलेने केला होता. तसेच त्याबाबत त्या व्यक्तीवर गुन्हाही दाखल केला होता. त्याचा खटला कनिष्ठ कोर्टात सुरु होता. मात्र कनिष्ठ कोर्टाने त्या खटल्यातन संबंधित व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली होती. कनिष्ठ कोर्टाच्या या निर्णयाला पोलिसांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टात सुनावणीदरम्यान, शारीरिक सबंधांसाठीच्या सहमतीच्याबाबतीत आता ‘नाही’ चा अर्थ ’नाही’ च्या पुढे जाऊन ’हो’ चा अर्थ ‘हो’ इथपर्यंत पोहचला आहे, असे हायकोर्टाने सांगितले.

निकाल देताना हायकोर्टाने दोन सज्ञान व्यक्ती परस्पर सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करत असतील तर तो गुन्हा ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच कनिष्ठ न्यायालयाच्या निकालामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नव्हती, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. विवाहाचे अमिष दाखवत शरीरसंबंध ठेवल्याच्या आरोपांचा उपयोग संबंधित महिलेने आरोपीसोबत झालेले आपले शरीरसंबंध योग्य ठरवण्यासाठी केला. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतरसुद्धा या आरोपामधून स्वत:चे वर्तन योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने वैद्यकीय तपासणीसही नकार दिला, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

सदर महिला शरीरसंबंधांसाठी आपली सहमती ही स्वेच्छेने नव्हे तर विवाहाचे आमिष दाखवून मिळवण्यात आल्याचे सांगत आहे. मात्र ही बाब सिद्ध होऊ शकली नाही. पहिल्यांदा बलात्काराचा आरोप केल्यानंतर तीन महिन्यांनी ही महिला आरोपीसोबत आपल्या मर्जीने हॉटेलमध्ये जाताना दिसली. त्यामुळे तिला विवाहाचे अमिष दाखवण्यात आल्याच्या तिच्या दाव्यात फारशी सत्यता नसल्याचे समोर आले आहे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.

First Published on: October 12, 2019 6:04 AM
Exit mobile version