महाराष्ट्र-कर्नाटकचे खूप जुने संबंध, फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात

महाराष्ट्र-कर्नाटकचे खूप जुने संबंध, फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात

कर्नाटकच्या चिक्कमंगळुरू येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरूवात थेट कन्नडमधून केली. त्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. भाषणामध्ये फडणवीसांनी महाराष्ट्र-कर्नाटकचे जुने संबंध, चिक्कमंगळुरू शहर आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांबाबत भाष्य केलं.

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे खूप जुने संबंध आहेत. तसेच मराठी आणि कन्नड या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहेत. दोन्ही भाषेतील साहित्य नागरिकांना दिशा देणारं आहे. त्यामुळे जेव्हा मला कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं, तेव्हा मी लगेच हे निमंत्रण स्वीकारलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या महोत्सवाचे थीम ‘एक भारत श्रेष्ठ भारत’वर आधारीत

मी येथे येण्याचं आणखी एक कारण म्हणजे माझे बंधू सीटी रवी यांच्या प्रेमामुळे. ते ज्या पद्धतीने काम करतात. ते मोठं असतं. त्यामुळे येथे येऊन मला मोठा महोत्सव बघायला मिळेल याची खात्री होती, म्हणून मी या कार्यक्रमाला आलो. या महोत्सवाचे संपूर्ण थीम ‘एक भारत श्रेष्ठ भारत’वर आधारीत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जगातील सर्वात जुन्या संस्कृतीपैकी एक आहोत. अशा संस्कृतीला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या महोत्सवाद्वारे केलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले.

…यासारखं स्वच्छ शहर मला कुठेही दिसलं नाही

आज पर्यंत अनेक शहरांमध्ये गेलो आहे. मात्र, चिक्कमंगळुरू इतकं स्वच्छ शहर मला कुठेही दिसलं नाही. कारण जेव्हा मी शहरात आलो. तेव्हा येथील स्वच्छता बघून मी भारावून गेलो. याचे पूर्ण श्रेय सीटी रवी यांचं नेतृत्व आणि महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जातं, असंही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : पक्षप्रमुखपद मुख्यमंत्र्यांना मिळालं तर आनंदच, आमदार संतोष बांगर यांचं मोठं विधान


 

First Published on: January 21, 2023 10:04 PM
Exit mobile version