ठरलं! भाजपा 26 तर, शिंदे आणि अजित पवार गटाला 22 जागा; फडणवीसांनी सांगितला लोकसभेचा फॉर्म्युला

ठरलं! भाजपा 26 तर, शिंदे आणि अजित पवार गटाला 22 जागा; फडणवीसांनी सांगितला लोकसभेचा फॉर्म्युला

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा तसेच शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात जागावाटपांचा फॉर्म्युला काय असेल, याबाबत तर्कवितर्क मांडण्यात येत होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे गणित जाहीर करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गट यामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी भाजपा 26 जागा, तर शिवसेना आणि अजित पवार गट मिळून 22 जागा लढविण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा – पाच राज्यांतील निवडणुकांचे निकालही असेच लागतील काय? संजय राऊतांनी भाजपाला डिवचले

सन 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 25 तर, शिवसेनेने 23 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी भाजपाने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. तर, यावेळी उमेदवारी निवडीचे निकष काय आहेत, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अजित पवार गट आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत अनौपचारिक बैठक झाली. गुणवत्ता तसेच विद्यमान खासदारांना फेरउमेदवारी, हे उमेदवार निवडीचे मुख्य सूत्र असेल, असा निर्णय घेण्यात आला, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकाने म्हटले आहे.

आम्ही सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचे सर्वेक्षण केले आहे. जे जिंकून येऊ शकतात, अशा उमेदवारांची माहिती आहे. 2019मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना फेरउमेदवारी देणे हा एक संकेत आहे. अर्थातच, हा अंतिम निर्णय नाही आणि तो घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा आणि वाटाघाटी केल्या जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय

नागपूरमध्ये येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराला सुरुवात होईल. हे अधिवेशन संपल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. एखाद्या विशिष्ट जागेवर भाजपचा उमेदवार निवडणूक लढवत असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचा उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करतील. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या बाबतीत हेच तत्व लागू होईल, असेही ते म्हणाले.

महायुती राज्यात किमान 40 ते 42 जागा जिंकेल, असा आपल्याला विश्वास आहे. आम्हाला राज्यातील तसेच देशातील लोकभावना माहीत आहे. लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची कामगिरी आणखी उंचावेल, असा दावाही त्यांनी केला.

First Published on: November 26, 2023 10:23 AM
Exit mobile version