शेतमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट दर

शेतमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट दर

शेतकर्‍यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किमतीच्या दीडपट दर मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला आहे. १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत सरकारने निश्चित केली आहे. करोना संकट काळातही शेतकर्‍यांनी धान्य पिकवले. अडचणीच्या काळातही शेतकरी थांबला नाही, अशा शब्दांत कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी बळीराजाच्या कामाचे कौतुक केले आहे.

१४ खरीप पिकांसाठीच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकर्‍यांना खर्चापेक्षा ५० ते ८३ टक्के अधिक उत्पन्न मिळेल, अशी माहिती तोमर यांनी दिली. करोना काळातील संकटाच्यादृष्टीने सोमवारी मोदी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर आणि नितीन गडकरींनी दिली.

शेतमालाला मिळणार्‍या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्याचे तोमर यांनी सांगितले. मक्याची किमान आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तूर, मूग यांची आधारभूत किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. १४ पिकांच्या किमतीत ५० ते ८३ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे तोमर म्हणाले.

अनेक शेतकर्‍यांनी शेतीसाठी कर्जे घेतली आहेत. त्यांची परतफेड करण्यासाठी त्यांना कालावधी वाढवून देण्यात आला आहे. शेतकर्‍यांना ऑगस्टपर्यंत कर्जाची परतफेड करता येईल, अशी माहिती तोमर यांनी दिली. करोना संकटातही शेतकर्‍यांनी बंपर उत्पादन केले. यापैकी ३६० लाख मेट्रिक टन गहू, १६.०७ लाख मेट्रिक टन डाळ सरकारने खरेदी केली आहे, असे तोमर यांनी सांगितले.

First Published on: June 2, 2020 6:51 AM
Exit mobile version