ठाकरे-शिंदे जोडी राम-लक्ष्मणाची, रामराज्याचा संघर्ष सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल; दिपाली सय्यद यांचे ट्विट

ठाकरे-शिंदे जोडी राम-लक्ष्मणाची, रामराज्याचा संघर्ष सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल; दिपाली सय्यद यांचे ट्विट

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. हे नाट्य थांबावं याकरता प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची जोडी राम-लक्ष्मणाची असल्याची दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. (Deepali Sayed tweet about Eknath Shinde and Uddhav Thackeray)

दिपाली सय्यद म्हणाल्या की, माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्त्वाच्या वनवासात कायम राहिल. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहिल. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल.

हेही वाचा – मी बंडखोर नाही, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला इशारा

दरम्यान, शिवसेने आपला मान राखला जात नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माझ्यासह अनेक आमदारांची घुसमट होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आम्ही सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाच्या शिकवणीने पुढे जात आहोत. कडवट हिंदुत्वाची भूमिका आम्ही सगळे आमदार पुढे घेऊ जात आहोत. आम्ही सगळेच बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असून, अद्यापही आम्ही शिवसेना सोडलेली नाही. तसेच यापुढेही शिवसेना सोडण्याचा विचार नाही. बाळासाहेबांनी देशाला दिलेला हिंदुत्वाचा विषय आम्ही पुढे घेऊन जाणार असल्याचा निर्धारही एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. आमच्या आमदारांची संध्याकाळी बैठक होणार असून, तेव्हा आम्ही निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त आमदारांची संख्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

First Published on: June 22, 2022 4:05 PM
Exit mobile version