देशातील मोठ्या प्रकल्पांना लता दीदींचे नाव द्या…राज ठाकरे

देशातील मोठ्या प्रकल्पांना लता दीदींचे नाव द्या…राज ठाकरे

शिवतीर्थावर मनसे मोठं शक्तिप्रदर्शन करणार; मुंबईतील मनसेची बैठक संपली

‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात एक प्रचंड मोठा प्रकल्प करावा आणि त्याला लता मंगेशकर यांचं नाव द्यावं’, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना झी २४ तास या वृत्तवाहिनीतर्फे ‘अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लता दीदींचं नाव द्या अशी विनंती केली.

“पंडितजींचा संगीताचा प्रवास हा विलक्षण आहे. महाराष्ट्र राज्यानं या सर्वांना उचलून धरलं पाहिजे. तुम्ही देशात मोठमोठे प्रोजेक्ट्स करत असता, देशातला एक प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या. तो इतका विलक्षण आणि मोठा प्रोजेक्ट असला पाहिजे, ज्याला दीदींचं नाव शोभलं पाहिजे,” अशी विनंती राज ठाकरे यांनी गडकरींकडे केली.’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

”अनेकदा मी मित्रांशी, सहकाऱ्यांशी बोलत असतो या देशात कलाकार, संगीतकार, गायक, नाट्यक्षेत्र, साहित्य, कवी, चित्रपटक्षेत्र ही सर्व मंडळी या देशात नसती तर कधीच अराजक आलं असतं. आपण यांच्यात गुंतून पडलो, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यात शिरलो म्हणून इतर वाईट गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं. यांचे आभार मानावे तर कसे हेच समजत नाही” असंही ते म्हणाले.

“जगाच्या पाठीवर तुम्हाला अशी इमारत कुठेही सापडणार नाही, ज्याच्या एका मजल्यावर लता दीदी राहायच्या, जिथे आशाताई राहायच्या, पंडित हृदयनाथ मंगेशकर राहतात, उषाताई राहतात, मीनाताई येऊनजाऊन असतात, अशा एका मजल्यावर या देशातल्या चित्रपटसृष्टीतील-संगीत क्षेत्रातील २०-२२ हजार गाणी आहेत. अशा प्रकारची वास्तू जगाच्या पाठीवर कुठे असेल असं मला वाटत नाही. येता जाता मी त्या इमारतीला नमस्कार करतो,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“आजही लता मंगेशकर असं म्हटल्यावर अजूनही चाचपडतोय, आपल्याला लता मंगेशकर सापडलेल्या नाहीत. ज्या दिवशी दीदी गेल्या त्या दिवशी मला एक व्यक्ती भेटल्या. लता दीदींना तुम्ही पाहिलंय, भेटलाय तुम्ही, आम्ही त्यांना भेटलो नाही, आम्ही त्यांना ऐकत आलोय आणि ऐकत राहू आमच्यासाठी त्या कुठे गेल्या,” अशी एक आठवणही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितली.


हेही वाचा – अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना

First Published on: March 26, 2022 11:31 AM
Exit mobile version