डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, मृत्यूंचं प्रमाण कमी

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, मृत्यूंचं प्रमाण कमी

महाराष्ट्र सरकारकडून डासांपासून होणाऱ्या आजारांचं समुळ उच्चाटन व्हावं यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तरीही, महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकताच नॅशनल हेल्थ पॉलिसी-२०१९ चा अहवाल जारी केला. या अहवालानुसार, महाराष्ट्रात गेल्या एका वर्षात ४० टक्क्यांनी डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. तर, मृत्यूंचं प्रमाण या तुलनेत कमी झाल्याचंही अहवालात मांडण्यात आलं आहे.

डेंग्यूने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

एडीस इजिप्ती या डासांच्या चाव्यानंतर व्यक्तीला डेंग्यू हा आजार होऊ शकतो. त्या व्यक्तीला ताप येतो आणि शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. नॅशनल हेल्थ पॉलिसीद्वारे जाहीर केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात २०१७ यावर्षी डेंग्यूचे ७ हजार २८९ रुग्ण आढळले होते. २०१८ मध्ये ११ हजार ११ लोकांना डेंग्यू झाला. म्हणजे डेंग्यूने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली. पण, दुसरीकडे मृतांच्या आकडेवारीत घट झाली असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण पंजाबमध्ये

२०१७ मध्ये डेंग्यूमुळे ६५ जणांना जीव गमवावा लागला होता. २०१८ मध्ये ५५ जणांनी डेंग्यूमुळे जीव गमावला. अहवालानुसार, २०१८ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण पंजाबमध्ये १४,९४८ एवढे रुग्ण आढळले होते. तर, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून ११ हजार ११ रुग्ण आढळले होते. तर, डेंग्यूमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांवर आहे.

नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं

याविषयी महाराष्ट्र राज्य अतिरिक्त आयुक्त आरोग्य विभाग डॉ. अर्चना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यात पाण्याची समस्या आहे. त्यामुळे तिथले लोक पाणी साठवून ठेवतात. तसंच, योग्य पद्धतीने त्या पाण्याला झाकून न ठेवल्यामुळे पाण्यावर डास जमा होऊ शकतात. ते डास त्या पाण्यात अंडी घालतात. त्यातून आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे, नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.”

First Published on: November 12, 2019 7:49 PM
Exit mobile version