अजित पवारांचा ST कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; शेवटची संधी, त्यानंतर कठोर कारवाईचा इशारा

अजित पवारांचा ST कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम; शेवटची संधी, त्यानंतर कठोर कारवाईचा इशारा

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर असून एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. पण आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने पुन्हा एकदा विनंती केली आहे. ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा, कोणाचीही नोकरी जाणार नाही. कामावर रुजू झाल्यानंतर इतर मागण्यांवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारवतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. ‘३१ मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हा. जे येणार नाहीत, त्याच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल आणि त्यानंतर वेगळी संधी मिळणार नाही,’ असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘आता एसटीचा प्रश्न सुटला आहे. काल स्पष्टपणे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहात अनिल परब यांनी अतिशय समंजस्यपणे, समजूदारपणे भूमिका घेतली. आता शेवटची संधी एसटी कर्मचाऱ्यांना दिली आहे. आपण त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलेले आहे. त्यांची जी काही पगारवाढ केली आहे, पूर्वीच्यापेक्षा त्यामध्ये साडेसातशे कोटी रुपयांची वार्षिक वाढ झालेली आहे. १ ते ३१ मार्चचा पगार १० तारखेपर्यंत नाही झाला, तर याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे तमाम एसटी कर्मचाऱ्यांना, चालक, कंटेक्टर यांना विनंती, आवाहन आहे की, मुला-मुलींच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना एसटीची फार गरज आहे. अडचणीच्या भागातून येतात, त्यांना दुसरे कोणतेही वाहन परवडणारे नाहीये.’

पुढे अजित पवार म्हणाले की, ‘मागील काही दिवसांत काही जणांना निलंबित केले आहे. काहींवर कारवाई केली आहे. त्यांना आता शेवटची संधी दिली आहे. आता त्यांनी कोणाचेही न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता, आता पुढे यावे आणि ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे. पण जर ३१ मार्चपर्यंत ऐकले नाही आणि जे येणार नाहीत, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग कुठेही मात्र त्यांना वेगळी संधी मिळणार नाही.’


हेही वाचा – अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना


 

First Published on: March 26, 2022 11:46 AM
Exit mobile version