मला पाडून दाखवाच; मुनगंटीवारांना अजित पवारांचं आव्हान

मला पाडून दाखवाच; मुनगंटीवारांना अजित पवारांचं आव्हान

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, अशी आरोळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळातच ठोकली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना उत्तर देताना मला पाडून दाखवाच, असे खुले आव्हान दिले.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सरकारला विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले गेले, मात्र, आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार विधानसभेत करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांच्या दाव्यांवर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. यावर मुनगंटीवरा यांना उत्तर देताना अजित पवारांनीही तुमचे आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केले.

उद्धव ठाकरे-अजित पवारांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित

उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, असा उपहाात्मक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सीरमसोबत कोरोना लसीसाठी काम सुरु केल्याचे ऐकल्यानंतर मी इंटरनेटवर काही गोष्टी सर्च करत होतो. तेव्हा एक वेबसाईट माझ्यासमोर ओपन झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात रसेल फॉस्टर नावाचे एक अभ्यासक आहेत. त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे, की तुमचा जन्म महिना तुमचे आचरण आणि कृती प्रभावित करतो. याचा अर्थ महिन्यानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व ठरते. माझा, तुमचा (अजित पवार), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जन्म महिना जुलै आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, याची मला खात्री झाली, अशी फटकेबाजी सुधीर मुनगंटीवारांनी केली.


हेही वाचा –  चर्चेविना शक्ती कायदा मंजूर करणं योग्य नाही – देवेंद्र फडणवीस


 

First Published on: December 15, 2020 3:34 PM
Exit mobile version