Pune Corona Update: पुणेकरांसाठी मॉल्स बंदच – अजित पवार

Pune Corona Update: पुणेकरांसाठी मॉल्स बंदच – अजित पवार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यात काळजी करण्यासारखी परिस्थिती असल्याचे अजित पवार म्हणाले. कारण पुण्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात असून याच टप्प्यातील नियमावली कायम असणार आहे. पुण्यातील मॉल्स सुरू करण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पण तज्ज्ञांच्या मते मॉल्समधून कोरोनाचा प्रसार वाढू शकतो, त्यामुळे पुढील काळात पुणेकरांसाठी मॉल्स बंदच असणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

नक्की अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले की, आज बैठकीमध्ये पुण्यातील मॉल्स सुरू करावे की नाही याबाबत चर्चा करण्यात आली. पण तज्ज्ञांनी सांगितले की, मॉल्समध्ये एअरकडिशनर (AC) असते आणि यामुळे तिच-तिच हवा मॉल्समध्ये पसरलेली असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. तसेच मॉल्समध्ये लोकं दुकानात गेल्याप्रमाणे एकदाच सर्व सामान घेऊन जात नाहीत, तर दुसऱ्या स्टोअरवर फिरत बसतात. याच अनुषंगाने मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजूनही कोरोनाची दुसरी लाट नियंत्रण आली नसल्यामुळे, नाईलाजाने हे निर्णय घ्यावे लागत आहेत.

पुढे अजित पवार यांनी सांगितले की, ३० जून २०२१च्या अहवालानुसार, पुण्याचा पॉझिटिव्ही दर मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढला आहे. पुण्यातील पॉझिटिव्ह दर गेल्या आठवड्यात ४.६ टक्के होता, पण आता ५.३ टक्के झाला आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ५.१ पॉझिटिव्ह दर होता, तो आता ५.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन्ही शहरात कोरोना वाढताना दिसत आहे. पण ग्रामीण भागात ७.६ टक्के असलेला पॉझिटिव्ह दर आता ७.३ टक्के झाला आहे. तरीही सर्व गोष्टींचा विचार करून तिसऱ्या टप्प्यातील नियमावली कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २४ जूनपासून ते ३० जूनपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुक्तांची संख्या यात तफावत दिसून आली. २९ जूनला ९२० कोरोनाबाधित आढळले होते आणि १ हजार ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. तर ३० जूनला १ हजार ४७२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि ८१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. हिच तफावत काळजी करण्यासारखी आहे. याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.


हेही वाचा – सरकार आणणं आणि पाडणं हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही – संजय राऊत


 

First Published on: July 2, 2021 2:01 PM
Exit mobile version