घरमहाराष्ट्रसरकार आणणं आणि पाडणं हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही - संजय...

सरकार आणणं आणि पाडणं हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही – संजय राऊत

Subscribe

सरकार आणणं आणि सरकार पाडणं किंवा त्यासाठी सहाय्य करणं ते केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर दिली आहे. सत्तेतल्या महत्त्वाच्या व्यक्तींची कोंडी करण्याचं काम सुरु आहे. जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा कारखाना ईडीनं सील केल्यानंतर संजय राऊत यांनी दिली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ईडीच्या कारवायांवर टीका केली. “जे सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांची अशा प्रकारे कोंडी करण्याचे पप्रयत्न सुरु आहेत. मला त्यातल्या आर्थिक आणि तांत्रिक बाबी माहित नाहीत. पण एक कारखाने चालू आहे. सहकार क्षेत्रामध्ये जरंडेश्वरला एक महत्त्वाचं स्थान आहे. ठिक आहे कारवाई केली असेल. एका कारखान्यावर हजारो-लाखो लोकांचं जीवन रोजगार अवलंबून आहे. यासंदर्भात मी काय बोलणार. कारवाया सुरु आहेत. कारवायांना गती आणली जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत. कारवाया घडवून आणू असे संदेश दिले जात आहेत. हे काय निर्मळ राजकारण नाही. जी महाराष्ट्राची परंपरा नाही. आमने-सामने येऊन आपण लढायला हवं. ईडी किंवा सीबीआयचा वापर हे पाठीतले वार आहेत. मी कोणत्याही पक्षावर खापर फोडत नाही. पण जे काही चाललं आहे, हे आपल्या राज्याच्या परंपरेला शोभणारं नाही. ईडीची कामं ईडीने करावीत, सीबीआयची कामं सीबीआयने करावीत. सरकार आणणं आणि सरकार पाडणं किंवा त्यासाठी सहाय्य करणं ते केंद्रीय तपास यंत्रणांचं काम नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

कितीही आपटा, जिंकणार तर आम्हीच

महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले. निवडणूक नको व्हायला हवी होती. पण कुणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा संजय राऊत यांनी केला.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्रात आहे, त्याचे प्रश्न दिल्लीत विचारले जातात. याबाबत एकतर विधीमंडळ सचिव, संसदीय कार्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सांगू शकतील. याबाबतचं उत्तर मी देऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने ते पद रिक्त झालं. कोरोनाच्या काळात तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र करुन निवडणूक घेणं हे सद्यस्थितीत टाळायला हवं असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. ते योग्यच होतं. मात्र आता निवडणूक आहे, तिन्ही पक्ष निर्णय घेतील. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार येणार आहेत. त्यांची टेस्ट केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत एखादा आमदार बाहेर राहिला तर निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा सर्वांशी संवाद आहे. कोणी कितीही आपटली तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार. विरोधकांनी निवडणूक टाळली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. जिंकणार तर आम्हीच, कितीही आरडाओरडा केला, कितीही संशयाचं वातावरण तयार केलं तरीही विरोधी पक्षाला या निवडणुकीत यश मिळणार नाही. विरोधकांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -