संगमनेरच्या नायब तहसीलदारास कोरोनाची लागण

संगमनेरच्या नायब तहसीलदारास कोरोनाची लागण

Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांनी पार केला २० लाखांचा आकडा

संगमनेरमध्ये कार्यरत असलेले हे नायब तहसीलदार जिल्ह्याच्या सीमा ओलांडत पुण्यात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

लॉकडाऊन काळात एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्या-येण्यास बंदी असताना संगमनेरातील काही अधिकारी जिल्ह्याबाहेर जात असल्याच्या चर्चा समाज माध्यमांतून घडत होत्या. नायब तहसीलदारच आता पुण्यात कोरोनाबाधित झाल्याने या चर्चांना पुष्टी मिळाली आहे. पुण्यातून संगमनेरमध्ये आलेल्या नायब तहसीलदार कार्यालयात काही अधिकारी-कर्मचार्‍यांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने जिल्ह्याच्या महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. नायब तहसीलदार पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. संबधित कर्मचार्‍यांचा शोध सुरु झाला आहे. त्यांना रविवारी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी नेले होते.

नायब तहसीलदारांना कोरोना संशयित लक्षणे आढळल्याने पुण्यात त्यांचा स्त्राव घेण्यात आला होता. त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असून त्यांच्यावर आता पुण्यात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली, याला दुजोरा देत ते गेल्या चार दिवसांपासून ते कार्यालयात आले नसल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी ‘आपलं महानगर’ला दिली. जिल्ह्यात संगमनेरमधील वरिष्ठ अधिकारीच कोरोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यात याची चर्चा सुरु आहे.

संगमनेरमध्ये आढळला ६२ वा रुग्ण

संगमनेरमध्ये सोमवारी ६२ वा कोरोनाचा रुग्ण आढळला. दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना रुग्णांमुळे संगमनेर आता कोरोना रुग्णांसाठी हॉटस्पॉट ठरले आहे. संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे बाधित आढळलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या सुनेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे येथील बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी संगमनेमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता त्यामुळे संगमनेरकरांना दिलासा मिळाला असतांना सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात तालुक्यातील शेडगाव येथील चाळीस वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. यामुळे तालुक्यातील करोनाचा आलेख पुन्हा उंचावला आहे. मुंबईतून ३१ मे रोजी शेडगाव येथे आलेल्या ६३ वर्षीय महिलेचा करोना अहवाल शुक्रवारी (५ जून) पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेकडून तिच्या सुनेला लागण झाली.

First Published on: June 8, 2020 6:44 PM
Exit mobile version