राष्ट्रवादीकडे मुद्दे नसल्यानेच दरेकरांना केलं जातंय टार्गेट

राष्ट्रवादीकडे मुद्दे नसल्यानेच दरेकरांना केलं जातंय टार्गेट

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या कुठलेही मुद्दे राहिले नसल्याने दरेकरांना टार्गेट केलं जात असल्याची टीका त्यांनी केली.

दरेकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. त्यावर दरेकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय. त्यांनी दरेकरांना इशाराही दिलाय. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, दरेकरांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. सध्या राष्ट्रवादीकडे काँग्रेसकडे कुठलेही मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करताहेत.

प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे हे दोघंही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिरुर दौऱ्यावर असताना दरेकरांनी एका जाहीर कार्यक्रमात हे विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्या वाक्यावरून वादंग उठलाय. दरेकर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसला गरीबांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे.

थोबाड आणि गाल रंगवण्याचा इशारा

दरेकरांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केलाय. दरेकरांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रवीण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यता आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचं थोबाड आणि गाल रंगवू शकतो, याची जाणीव ठेवा, असा इशाराच चाकणकरांनी दिलाय.

First Published on: September 14, 2021 10:27 PM
Exit mobile version