पोपट मेलाय, मविआला चांगलंच…; आमदारांच्या अपात्रतेबाबत देवेंद्र फडणवीसांचा टोला

पोपट मेलाय, मविआला चांगलंच…; आमदारांच्या अपात्रतेबाबत देवेंद्र फडणवीसांचा टोला

 

पुणेः पोपट मेलाय हे महाविकास आघाडीला चांगलच माहिती आहे. तरीही ते म्हणतात पोपट मान हलवत नाही. हात पाय हलवत नाही. शेवटी त्यांच्याही लोकांना त्यांना काही तरी सांगाव लागतं. काही तरी आशा दाखवावी लागते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस यांना १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत प्रश्न विचारण्यात आले. ठाकरे गट म्हणतोय की १६ आमदार अपात्र ठरतील, याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, १६ आमदार अपात्र ठरतील की नाही यावर मी भाष्य करणार नाही. हा विषय सन्मानीय विधानसभा अध्यक्षांकडे आहे. ते कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेतलीच. पण एक कायद्याचा अभ्यासक म्हणून. तसेच गेली २५ वर्षे राजकारणात काम करतोय या नात्याने मी सांगेन की मविआला चांगलच माहिती आहे की पोपट मेला आहे. तरीही तो मान हलवत नाही. हात पाय हलवत नाही, असे ते सांगत आहेत. शेवटी त्यांनाही त्यांच्या लोकांना काही तरी सांगाव लागत. त्यामुळे ते अजूनही आशेवर आहेत, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

वज्रमुठ सभेची पुण्यात जय्यत तयारी सुरु आहे, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्यामध्येच वाद सुरु आहेत की सभेला कोणी कुठे बसायचं. आधी कोण बोलणार. मग कोण बोलणार, असे सर्व प्रकार त्यांच्यात सुरु आहेत. पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात योग्य ते लिहिलं आहे. परिणामी मी आता त्यांच्याविषयी काय बोलणार.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार वज्रमुठ सभेच्या तयारीची पुन्हा सुरुवातही झाली. त्यावर फडणवीस यांनी मविआवर निशाणा साधला.

First Published on: May 15, 2023 9:53 PM
Exit mobile version