हे सरकार आंतरविरोधाने पडेल आणि त्याला सुरुवात झालीये; फडणवीसांचा दावा

हे सरकार आंतरविरोधाने पडेल आणि त्याला सुरुवात झालीये; फडणवीसांचा दावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आंतरविरोधाने पडेल, असा पुनरुच्चार करताना सरकारमधील आंतरविरोधाला सुरुवात झाली असल्याचा दावा केला आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्ही प्रयत्नशील नाही, पण ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा आम्ही सक्षम पर्याय देऊ, असं देखील फडणवीस यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत देताना सत्ता स्थापनेसाठी आम्ही कुठेही प्रयत्नशील नसल्याचं म्हटलं आहे. हे सरकार आंतरविरोधाने पडेल आणि आता आंतरविरोधाला सुरूवात झाली आहे. ज्या दिवशी सरकार पडेल त्यादिवशी आम्ही पर्याय देवू, असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. मंत्री घोषणा करतात, कॅबिनेटला गेलेले नसतात. महाविकास आघाडीत समन्वयाला वेळ लागतोय. बहुतांश ठिकाणी तातडीची मदत मिळालेली नाही, असं देखील फडणवीसांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना सोबत घेऊन बसावं आणि मदतीबाबत निर्णय घ्यावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला.

मुख्यमंत्र्यांशी व्यक्तिगत संबंध स्नेहाचे

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर तसंच नुकताच वाढदिवस देखील मुख्यमंत्र्यांचा झाला, त्यावर भाष्य केलं. मी मुख्यमंत्र्यांना कधीही फोन करुन त्यांच्याशी बोलू शकतो. मी उद्धवजींना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. गेली २५ वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र राहिलो आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांसमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो, असं फडणवीस म्हणाले.

 

First Published on: July 29, 2021 1:31 PM
Exit mobile version